Pakistan cyber attacks India : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात सायबर युद्धाचे नवे रणांगण उघडले आहे. सीमापारुन फिजिकल हल्ल्यांबरोबरच आता सायबर हल्ल्यांची मालिका भारतातील सरकारी यंत्रणा, खासगी कंपन्या आणि नागरिकांवर केली जात आहे. हे हल्ले केवळ आर्थिक नुकसानच करत नाहीत, तर भारताच्या डिजिटल सुरक्षेवरही मोठा प्रश्नचिन्ह उभा करतात.
पाकिस्तानकडून होत असलेल्या या सायबर हल्ल्यांमागे राजकीय उद्दिष्टे, फसवणूक आणि भारताच्या महत्त्वपूर्ण माहिती प्रणालींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून पाकिस्तानला काहीही मिळत नाही, पण भारताला मात्र हजारो कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.
सायबर हल्ला म्हणजे काय आणि त्यामागचा हेतू कोणता?
सायबर हल्ला म्हणजे एखाद्या देशाच्या संगणकीय प्रणालीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून तांत्रिक बिघाड निर्माण करणे, माहिती चोरणे किंवा ती माहिती नष्ट करणे. हे हल्ले सरकारी यंत्रणा, बँका, आरोग्य सेवांचे डेटा सेंटर्स, शिक्षण संस्था आणि खासगी उद्योगांवर केले जातात.
पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या हल्ल्यांची साखळी सुरू आहे. हॅकर्स भारतीय नागरिकांच्या सोशल मीडिया खात्यांपासून ते सरकारी वेबसाईट्सपर्यंत सर्वत्र घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे हल्ले केवळ तांत्रिक नसून, माहितीची चोरी, अफवा पसरवणे, नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला धक्का देणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारतासोबत युद्ध झाले तर मी इंग्लंडला… ‘, पाकिस्तानी खासदाराचे विधान VIRAL, PM मोदींवरही हास्यास्पद विधान
पाकिस्तानी सायबर हल्ल्यांमुळे किती नुकसान?
2025 मध्ये सादर झालेल्या एका विशेष अहवालानुसार, भारताला सायबर गुन्ह्यांमुळे तब्बल ₹20,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा धोका आहे. क्लाउडसेक या नामांकित सायबर सुरक्षाविषयक संस्थेच्या म्हणण्यानुसार, केवळ कंपन्यांच्या नावाचा वापर करून झालेल्या फसवणुकीची किंमत ₹9,000 कोटींच्या घरात आहे.
त्याचप्रमाणे, इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या आकडेवारीनुसार, 2024 च्या पहिल्या 9 महिन्यांत भारताला सायबर गुन्ह्यांमुळे ₹11,333 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात ई-मेल हॅकिंग, बँक फ्रॉड, रॅन्समवेअर आक्रमण, आणि महत्त्वाच्या डेटावर नियंत्रण मिळवण्याचे प्रकार आघाडीवर आहेत.
राजकीय आणि गुन्हेगारी उद्देशाने सायबर हल्ले
सायबर हल्ल्यांचे स्वरूप राजकीय, वैयक्तिक आणि आर्थिक फायद्यासाठी घडते. काही वेळा कंपनीतील माजी कर्मचारी किंवा प्रतिस्पर्धी संस्थेतील हॅकर्स अंतर्गत माहिती चोरण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी याचा वापर करतात. मात्र, पाकिस्तानकडून केले जाणारे हल्ले हे अधिकतर राजकीय आणि रणनीतिक उद्देशांवर आधारित असतात. या हल्ल्यांद्वारे भारतीय सरकारच्या गुप्त यंत्रणांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न, सामाजिक अस्थिरता पसरवणे, किंवा देशांतर्गत धोरणांवर प्रभाव टाकण्याचा कट केले जातो. अशा कृतींना सायबर युद्ध (Cyber Warfare) म्हणतात, ज्यामध्ये सॉफ्टवेअर हत्यार बनते आणि संगणक रणांगण.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचा ‘हा’ सिक्रेट एअरबेस म्हणजे पाकिस्तानच्या घशात अडकलेला काटा, का? ते जाणून घ्या
डिजिटल युद्धात भारत सतर्क, पण हल्ले गंभीर
पाकिस्तानकडून सुरू असलेले सायबर हल्ले हे त्याच्या पारंपरिक युद्धशक्तीतील असमर्थतेचा पुरावा आहेत. हे हल्ले बालिश वर्तनाचे प्रतीक असले, तरी भारतासाठी ते गंभीर परिणाम घडवणारे ठरू शकतात. भारताने या सायबर धोक्यांवर उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सायबर सुरक्षाव्यवस्था बळकट केली असून, CERT-IN, NCIIPC आणि I4C यांसारख्या यंत्रणा सक्रिय आहेत. पण तरीही नागरिकांनी आणि कंपन्यांनी स्वतंत्र पातळीवर सायबर सुरक्षेच्या उपाययोजना कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. कारण युद्ध आता केवळ सीमा ओलांडून न करता, संगणकाच्या पडद्यामागूनही लढले जात आहे – आणि त्यात सावधगिरी हीच सर्वात मोठी ढाल आहे.