International Plastic Bag Free Day : आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन (International Plastic Bag Free Day). जगभरात ३ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने लोकांना प्लास्टिकपासून होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक आणि पर्यावरणीय परिणामांबद्दल जागरूक केले जाते. सहज दिसणारी प्लास्टिकची पिशवी किंवा बाटली आपल्या शरीरात शिरून कर्करोग, प्रजनन क्षमता कमी होणे, फुफ्फुसांचे नुकसान, आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यांसारख्या आजारांना आमंत्रण देते, हे बहुतांश लोकांना माहीतच नसते.
प्लास्टिक आपल्या शरीरात कसे पोहोचते?
आपल्या आजूबाजूचा बहुतांश अन्न, पाणी, व खाद्यपदार्थ प्लास्टिकमध्ये साठवला जातो. गरम पदार्थ प्लास्टिकच्या डब्यात ठेवले जातात, पाणी प्लास्टिकच्या बाटल्यांतून प्यायले जाते. या प्रक्रियेतून बीपीए (Bisphenol A), फॅथलेट्स (Phthalates) आणि इतर अनेक विषारी रसायने अन्नात मिसळतात. हेच अन्न किंवा पाणी आपण रोज सेवन करतो आणि अशा प्रकारे हे विष आपल्याच शरीरात प्रवेश करते.
प्लास्टिकमुळे होणारे आरोग्याचे धोके – वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध परिणाम
-
प्रजनन क्षमता कमी होणे:
प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या बीपीए व फॅथलेट्स यांसारख्या रसायनांमुळे हार्मोनल असंतुलन होते. याचा थेट परिणाम स्त्री-पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. -
कर्करोगाचा धोका:
प्लास्टिकमध्ये पॅक केलेले अन्न नियमित खाल्ल्यास यकृत, स्तन व प्रोस्टेट कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. -
श्वसन तक्रारी:
जळणाऱ्या प्लास्टिकमधून निघणारे विषारी वायू (डायॉक्सिन, फ्युरान) श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून शरीरात जातात व फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करतात. -
स्मरणशक्ती कमकुवत होणे:
प्लास्टिकमधील रसायनांचा गर्भात वाढणाऱ्या बाळांवर परिणाम होतो. त्यामुळे बौद्धिक विकास मंदावतो आणि स्मरणशक्ती कमकुवत होते. -
रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे:
प्लास्टिकच्या संपर्कातून शरीरात जाणारे विष शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीवर आघात करतात. यामुळे सतत आजारपण, संसर्ग होण्याची शक्यता वाढते. -
यकृत व मूत्रपिंडावर परिणाम:
शरीरातील विषारी घटक काढण्याचं काम यकृत व मूत्रपिंड करतं. पण प्लास्टिकमधील रसायने या अवयवांवरही हळूहळू नकारात्मक परिणाम करू लागतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीचा वेग वाढतोय! मानव इतिहासातील सर्वात ‘लहान दिवस’ जुलै-ऑगस्टमध्ये अनुभवण्याची शक्यता
पर्यावरणाला हानी – केवळ तुमच्यापुरते नाही, सृष्टीसाठीही घातक
दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा नद्या, तलावांमध्ये टाकला जातो. एकदाच वापरायच्या वस्तू – प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, कंटेनर – हे सर्व वर्षानुवर्षे विघटित होत नाहीत. हेच प्लास्टिक माश्यांच्या पोटात जातं, जलचर मरतात. शेवटी, हे प्लास्टिक पुन्हा आपल्या पाण्यात मिसळतं आणि आपल्या शरीरात पोहोचतं.
या दिवसाचं महत्त्व
प्लास्टिकच्या वापराबाबत जागरूकता वाढवण्यासाठीच ३ जुलैला आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा केला जातो. यामागचा हेतू आहे – लोकांनी पर्यावरणपूरक पर्याय निवडावेत, जसे की कापडी पिशव्या, स्टीलच्या बाटल्या, ग्लास कंटेनर इ.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कहाणी आहे ‘या’ हजार वर्ष जुन्या शिव मंदिराची, जे बनले आहे थायलंड-कंबोडियामधील संघर्षाचा केंद्रबिंदू
प्लास्टिकचा मोह सोडणे
प्लास्टिकचा मोह सोडणे आज गरजेचं झालं आहे. आपल्या शरीरात शिरणाऱ्या या ‘न दिसणाऱ्या विषा’ला थांबवण्यासाठी आता कृतीची वेळ आहे. प्रत्येकवेळी प्लास्टिक वापरण्याआधी एकदा स्वतःला विचार करा, हे सोयचं आहे, पण आरोग्य आणि पर्यावरणाच्या किंमतीवर किती काळ?