पक्षी सप्ताह(फोटो-सोशल मीडिया)
सुनयना सोनवणे/ पुणे : सध्या सगळीकडे पक्षी सप्ताह ( ५ ते १२ नोव्हेंबर ) साजरा होत आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा शहरांच्या वाढत्या मर्यादांमुळे निसर्ग आणि पक्ष्यांच्या जगण्यावर काय परिणाम होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहराने विकासाची नवी शिखरे गाठली असली, तरी या प्रगतीच्या वाटचालीत निसर्गावर, विशेषतः पक्ष्यांच्या अधिवासावर, मोठे अतिक्रमण झाले आहे.
एकेकाळी शहरातील वाडे, अंगणे, आणि डेरेदार झाडे हे अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान होते. झाडांच्या फांद्यांमध्ये, खोडांमध्ये आणि पोकळ डोल्यांमध्ये असंख्य घरटी वसलेली असायची. पण आता वाडा संस्कृती संपली आणि उंच इमारतींनी आणि काँक्रीटच्या भिंतींनी ती जागा घेतली. आज झाडांची संख्या झपाट्याने कमी होत असून पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच उरलेली नाही.
पुणे जिल्ह्यात आजवर ४०० हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. मात्र शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण, आणि हवामान बदल यामुळे अनेक पक्ष्यांची जीवनशैली विस्कळीत झाली आहे. पर्जन्यमानातील बदल आणि अन्नाच्या टंचाईमुळे काही पक्षी स्थलांतरित झाले, तर काही पूर्णपणे नामशेष होऊ लागले आहेत.
हेही वाचा : IND vs SA : या’ खेळाडूने घातलाय धावांचा रतीब! भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत गाठला ५०० धावांचा टप्पा
वड, पिंपळ, चिंच, आंबा यांसारख्या झाडांवर घरटी बांधणारे पक्षी आज मोठ्या प्रमाणावर टॉवर, होर्डिंग आणि पथदिव्यांच्या खांबांवर आपले घरटे तयार करत आहेत. प्लास्टिकचे तुकडे, नायलॉन धागे, बाटल्यांची झाकणे, बुटांच्या नाड्या, कपड्यांची बटणे अशा घातक वस्तूंचा वापर करून पक्षी घरटी बांधतात. या साहित्यामुळे लहान पिलांना दुखापत होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे पक्षीप्रेमी सांगतात.
शहरातील घार, कावळे, करकोचा यांसारख्या मोठ्या पक्ष्यांनी उंच झाडांऐवजी मोबाइल टॉवर आणि होर्डिंगवर घरटी बांधण्याचा पर्याय शोधला आहे. सुगरण पक्षी तारांवर घरटे बांधताना दिसतो, तर सूर्यपक्षी, शिंपी आणि बुलबुल यांनी गॅलरीतील कुंड्यांच्या आडोशात निवास शोधला आहे. कबुतरे आणि पोपट उंच इमारतींच्या कोनाड्यात, एसी बॉक्समध्ये किंवा खिडक्यांच्या शेंड्याकडे घरटी करतात. परंतु अशा ठिकाणी त्यांचा जीव सतत धोक्यात असतो . टॉवर दुरुस्तीच्या वेळी घरटी तोडली जातात, आणि पक्ष्यांना पुन्हा पुन्हा नवीन घरटे बांधावे लागते.
या सगळ्या परिस्थितीत कृत्रिम घरटी पक्ष्यांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. पुण्यातील अनेक निसर्गप्रेमी संस्था आणि नागरिक झाडांवर लाकडी घरटी बसवत आहेत. अशा कृत्रिम घरट्यांमध्ये झाडांच्या पोकळीत घरटी बांधणारे पक्षी, जसे की शिंपी, बुलबुल किंवा साळुंकी, आता वास्तव करताना दिसतात. धनेश पक्ष्यासाठी तर खास घरटी तयार करण्याचा उपक्रम सुरु आहे. या पक्ष्याने झाडांची पोकळी बंद करून पिलांची वाढ सुरक्षित ठेवायची सवय असते, त्यामुळे त्याला कृत्रिम घरटे विशेष उपयुक्त ठरते.
दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान पुण्यात अनेक स्थलांतरित पक्षी येतात आणि मार्चपर्यंत थांबतात. त्यातले काही पक्षी हे मुळा-मुठा नदीकाठ, पाषाण तलाव, सारसबाग, खडकवासला आणि परिसरातील पाणथळ जागेत येतात. या स्थलांतरित पक्ष्यांचे हे महत्त्वाचे निवासस्थान बनले आहेत. येथे बगळे, पानकावळे, रातबगळे आणि इतर पाणथळ पक्षी वावरताना दिसतात.
अलाईव्हचे चॅरिटेबल ट्रस्टचे निसर्ग अभ्यास्क व विश्वस्त, राजेंद्र कांबळे नवराष्ट्रशी या संदर्भात बोलताना म्हणाले, नैसर्गिक अधिवास हा महत्त्वाचा असतोच, त्यामुळे झाडे वाचवणे आणि नवीन झाडे लावणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. मात्र शहरात आढळणारे चिमणी, मैना, रॉबिन अशा पक्षांचा अधिवास हरवत आहे. त्यामुळे कृत्रिम घरटे त्यांना त्यांचा अधिवास पुरवत आहेत. आम्ही शहरात विविध ठिकाणी कृत्रिम घरटे ठेवले आहेत. त्याचा उपयोगही हे पक्षी करत आहेत. आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आणि पक्षी अभ्यासक उमेश वाघेला यांनी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले घरटी शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आली आहेत. या घरट्याच्या स्वीकार पक्ष्यांच्या एकूण ११ जातींनी स्वीकार केला आहे.
शहरातील पक्षीप्रेमींच्या म्हणण्यानुसार निसर्गाशी समरस होऊन जगणाऱ्या या मुक्या जीवांचा विचार करायला हवा. झाडांची लागवड, त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न, पाण्याची उपलब्धता, आणि कृत्रिम घरटी या उपायांद्वारे आपण पक्ष्यांना पुन्हा आपल्या शहरात परत आणू शकतो.






