भारतीय कसोटी संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA Test series : दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ भारतीय दौऱ्यावर आला असून यजमान भारतीय संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. १४ नोव्हेंबरपासून कोलकाता इडन गार्डन्सवर पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा कसोटी इतिहास बघितला तर या दोन संघात ४४ सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यांनी अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत ५०० धावांचा टप्पा गाठणारा एकमेव खेळाडू हा भारतीय आहे. या खेळाडूबद्दल आपण माहिती घेऊया.
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या भारतीय खेळाडूने ऑक्टोबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत ५०० धावांचा टप्पा गाठण्याची किमया साधली आहे. संपूर्ण मालिकेत, रोहित शर्माने तीन सामन्यांमध्ये चार डावांमध्ये १३२.२५ च्या सरासरीने ५२९ धावा केल्या होत्या. उजव्या हाताचा सलामीवीर रोहित शर्माने या मालिकेत चार डाव खेळले, यामध्ये त्याने तीन शतके झळकवली होती. या मालिकेत त्याने ६२ चौकार आणि १९ षटकार लगावले होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचा पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने २४४ चेंडूत ६ षटकार आणि २३ चौकार मारत १७६ धावा फटकावल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याने १४९ चेंडूत १२७ धावा केल्या, त्यात ७ षटकार आणि १० चौकार मारले होते. भारताने २०३ धावांनी हा सामना खिशात घातला होता.
या मालिकेतील दूसरा सामना पुण्यात खेळवण्यात आला आता, जय सामन्यात भारताने फक्त एक डाव खेळला. रोहितने ३५ चेंडूत १ चौकारासह १४ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली (२५४) आणि मयंक अग्रवाल (१०८) यांच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने एक डाव आणि १३७ धावांनी सामना आपल्या नावे केला होता.
हेही वाचा : “भारताकडून खेळायचे असेल तर…,”BCCI ने दिला रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सज्जड दम; दिग्गजांचे भवितव्य संकटात
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना रांची येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात रोहित शर्माने पहिल्या डावात सलामीवीर म्हणून २१२ धावा केल्या. त्याने २५५ चेंडूंचा सामना केला होता. या खेळीत ६ षटकार आणि २८ चौकार मारले होते. भारताने ४९७/९ वर डाव घोषित केला. हा सामना देखील भारतीय संघाने एक डाव आणि २०२ धावांनी सामना जिंकला आणि मालिका ३-० ने क्लिन स्वीप केली.






