फोटो सौजन्य: गुगल
इतिहासातील सत्य घटनेवर आधारीत सिनेमांना कायम पसंती दिली जाते. सध्या अशाच एका सिनेमाला बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांचा भरभरुन पसंती मिळत आहे तो सिनेमा म्हणजे ‘छावा’. कपाळी चंद्रकोर, डोक्यावर जिरेटोप, गळ्यात कवड्य़ांच्य़ा माळा, अंगात दहा हत्तीचं बळ आणि हृदयात मायमातीचा असलेला अतोनात आदर अशा या रणधुरंधर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित सिनेमा पाहाताना उर भरुन येतो आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
छावा सिनेमा आला आणि महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं जातं आहे. ‘छावा’ पाहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला स्वराज्याच्या या धाकल्या धन्याच्या त्यागाच्या, बलिदानाच्या घटनांचा थरार पाहताना काळीज पिळवटून जातं. ‘छावा’ सिनेमाला आज मोठ्या प्रमाणात यश मिळत असलं तरी सिनेमाच्या कथेची पाळंमुळं ही 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवाजी सावंत लिखित छावा या ऐतिहासिक कादंबरीत सापडतात.
‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा इतिहासकार शिवाजी सावंत यांचं नाव चर्चेच आलं. आज जे या सिनेमाला यश मिळत आहे, त्याचं यशाचं काहीसं श्रेय हे शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीलादेखील जातं. 1980 आणि त्या दरम्यानच्या काळात समजात शंभूराजेंबाबात अनेक संभ्रम होते. त्यावेळच्या लोकांची शंभूराजेंबाबत नकारात्मक मानसिकता आणि असंख्य गैरसमज होते आणि याच काळात शिवाजी सावंतांनी लिहिलेल्या ‘छावा’ या कादंबरीने शंभूराजांनी खरी ओळख जनसामान्यांना करुन दिली. ‘छावा’ कादंबरी संदर्भात डीडीला दिलेल्या मुलाखतीत शिवाजी सावंत यांनी कादंबरी लिहिताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.
शिवाजी सावंत यांनी छावा लिहीण्याआधी मृत्युंजय कादंबरी लिहिली होती. छावा ही सावंतांनी लिहिलेली दुसरी कांदबरी. इतिहासाची पाळंमुळं शोधताना बारीक सारीक घटनांचा अभ्यास आणि पुरावे गोळा करणं हे आव्हानात्मक असलं तरी हे शिवधनुष्य सावंतांनी यशस्वीरित्या पेललं. शिवरायांचा इतिहासाची बऱ्यपैकी सर्वसामान्यांना ओळख होती मात्र शिवपुत्र शंभूराजेंचा इतिहास छावाच्या निमित्ताने पुढे आला. शिवाजी सामंत मुलाखतीत म्हणाले की, शंभूराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक दिवसांच्या नोंदी सावंतांनी मिळालेल्या पुराव्यातून करुन ठेवल्या. अशा असंख्य नोंदीच्य़ा एकूण चौदा फाईल तयार झाल्या. छावा लिहिताना शिवाजी सावंतांचा दृष्टीकोन असा होता की, स्वराज्याचा या वीर पराक्रमी योद्ध्याच्या आयुष्य़ाशी निगडित एक एक प्रसंग महत्त्वाचा होता. त्यामुळे बारीक सारीक घटनांकडे दुर्लक्ष करुन चालणार नव्हतं. कांदबरीसाठी रायगड, पुरंदर, गोवा आणि अशा राजांच्या कारकिर्दीतल्या असंख्य किल्ल्यांना सावंतांनी भेट दिली.
शंभूरांजांचा पराक्रम, राजांचा दृष्टीकोन, त्याकाळतली राजेमहाराजांची व्यावहारिक भाषा, मराठ्यांच्या मावळ्यांची रांगडी भाषा, मुघल सैन्यातील दफ्तरी भाषा या सगळ्याचा अभ्यास करुन शंभूराजांचं व्यक्तीमत्त्व कादंबरीत साकारणं मुख्य काम होतं. याचबरोबर सावंतांनी भाषेबाबत आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो गागाभट्ट यांच्याबाबतीत. शिवाजी सावंत म्हणाले की, गागाभट्ट हे उत्तर भारतीय होते. गागाभट्ट हिंदी भाषिक असले तरी त्यांची हिंदी उर्दू मिश्रित नाही तर संस्कृत मिश्रित हिंदी होती. शिवाजी सामंतांच्या ‘छावा’ या कांदबरीचं प्रकाशन राजगडावर यशवंत चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं.
सेतु माधवराव पगडी य़ांच्य़ा सारख्या अनेक जाणकार इतिहासकारांनी ‘छावा’ कादंबरीचं कौतुकदेखील केलं होतं. त्यावेळी सावंतांना आचार्य अत्रे यांनी विचारलं होतं की, शिवारायांपेक्षा त्यांच्या मुलाला तुम्ही कादंबरीमध्य़े मोठं दाखवणार आहात का ? त्यावर सावंतांनी उत्तर दिलं होतं की, “शंभूराजे छावा आहेत तर शिवराय सिंह आहेत त्यामुळे लहान मोठं दाखवण्याचा प्रश्नच येत नाही”. खरतर इतिहासात अनेक राजे होऊन गेले. मात्र रयतेसाठी, धर्मासाठी प्राण पणाला लावणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच तत्वांवर स्वराज्याचं शिवधनुष्य पेलणाऱ्या छत्रपती शंभूराजेंनी ज्या धाडसाने बलिदान दिलं, ते आजवर कोणत्या राजाने केलं नाही.
स्वकीयांनी केलेली फितुरी केली , मुघलांनी केैद केलं पण धर्म सोडला नाही. असा रयतेच्या कल्याणासाठी त्याग करणारा राजा इतिहासात झाला नाही. छत्रपती शिवरायांचं कार्य थोर आहेच पण शंभूराजांचा पराक्रम, धर्म आणि रयतेच्या कल्याणासाठी प्राणांची आहुती दिली, म्हणूनच आज धर्म आणि देश टिकून आहे. आज घेतला जाणारा प्रत्येक श्वास हा सह्याद्रीच्या छाव्याने दिलेल्या बलिदानामुळेच. सिनेमाला मिळणारा उदंड प्रतिसाद ही चांगली बाब आहेच मात्र सिनेमा पाहून अतिभावनिक होण्यापेक्षा शंभूराजे आणि त्यांचा पराक्रम समजून घ्यायचा असेल तर इतिहासाची पानं चाळणं, खरा इतिहास समजून घेणं आणि शंभूराजांचे विचार आत्मसात करणं महत्त्वाचं आहे.
जय शिवराय, जय शंभूराजे!…