१९७१ मध्ये १५ दिवस हिरव्या कापडाने झाकलेला होता ताजमहाल; वाचा यामागील रंजक कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Taj Mahal green cloth 1971 : देशाच्या उत्तरेकडील सीमांवर युद्धसदृश तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या मॉक ड्रिलचा उद्देश म्हणजे सामान्य नागरिकांना युद्धकालीन परिस्थितीमध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक देणे. विशेष बाब म्हणजे, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी ताजमहाल तब्बल १५ दिवस हिरव्या कापडाने झाकण्यात आला होता, अशी ऐतिहासिक आठवण यानिमित्ताने पुन्हा उजळून निघाली आहे.
१९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या युद्धात पाकिस्तानकडून हवेतून मोठ्या हल्ल्याची शक्यता होती. अशा वेळी भारत सरकारने आग्र्यातील जागतिक वारसा असलेल्या ताजमहालसारख्या महत्त्वाच्या स्थळांचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. ताजमहाल ही पांढऱ्या संगमरवरी भव्य इमारत अंतरावरूनही स्पष्ट दिसते, त्यामुळे ती शत्रूच्या हल्ल्याचे संभाव्य लक्ष्य ठरू शकत होती.
ताजमहाल १५ दिवस हिरव्या ज्यूट कापडाने झाकण्यात आला होता, त्याभोवती झुडुपे, फांद्या आणि नैसर्गिक अडथळे तयार करण्यात आले होते. या कालावधीत पर्यटकांना ताजमहालमध्ये प्रवेश दिला गेला नव्हता. हा उपाय यशस्वी ठरला होता आणि या ऐतिहासिक स्मारकाचे पूर्ण संरक्षण करण्यात सरकार यशस्वी झाले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आम्ही एकही क्षेपणास्त्र रोखू शकलो नाही…’ पाकिस्तानी तरुणाचा स्वतःच्याच सैन्यावर हल्लाबोल, VIDEO VIRAL
भारत सरकारने ६-७ मे च्या रात्री पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले, ज्याचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असे देण्यात आले आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया आली असून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याला “युद्धाची कृती” असे संबोधले आहे. परिणामी, भारत-पाकिस्तान सीमांवर तणाव पुन्हा वाढला आहे.
या परिस्थितीत सामान्य नागरिकांची सुरक्षितता, तसेच देशातील आर्थिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. ७ मे रोजी आयोजित केलेल्या मॉक ड्रिलमध्ये नागरी संरक्षण यंत्रणा, पोलीस, आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय सहभाग घेणार आहेत. नागरिकांना एअर अलर्ट मिळाल्यानंतर काय करावे, कुठे लपावे, मदत कशी मागावी, याचे प्रात्यक्षिक दिले जाईल.
सध्या तरी उत्तर प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारकडून ताजमहाल झाकण्यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, जर सीमेवरील परिस्थिती आणखी बिघडली आणि हवाई हल्ल्यांचा धोका वाढला, तर १९७१ प्रमाणेच ताजमहालला संरक्षण देण्यासाठी पुन्हा झाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो, तेव्हा ऐतिहासिक वारसा संरक्षित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. मॉक ड्रिलमधून याच गोष्टींचा सराव केला जात आहे – देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे प्रबोधन.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मोठी बातमी! लाहोरमध्ये साखळी स्फोटांनी पाकिस्तान पुन्हा हादरला, क्षेपणास्त्र हल्ल्याचा संशय
१९७१ मधील युद्ध, ताजमहालचे संरक्षण, आणि आज पुन्हा उद्भवलेली परिस्थिती हे सर्व इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सरकार सज्ज आहे, यंत्रणा सतर्क आहेत, आणि नागरिकांनाही सजग राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जर देश पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर आला, तर ताजमहालसारख्या अमूल्य वास्तूचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून आपल्या वारशाचे जतन करण्याची राष्ट्रीय कर्तव्य भावना आहे.