राजस्थानमधील 'हे' प्रसिद्ध गणेश मंदिर जिथे प्रेमी जोडप्यांना मिळतो दैवी आशीर्वाद; अविवाहितांनाही मिळते लग्नाची हमी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Ishqiya Ganesh Temple : भारतातील प्रत्येक शुभकार्याची सुरुवात “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषाने होते. गणेश हे विघ्नहर्ता, मंगलकर्ता आणि नव्या सुरुवातीचे अधिष्ठाता मानले जातात. लग्न, गृहप्रवेश, नवं कामकाज असो की कुठलेही मंगल कार्य गणेशपूजेविना ते पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात एक असे गणेश मंदिर आहे जेथे केवळ भक्त नाही, तर सर्वाधिक प्रेमी जोडपी एकत्र येतात. या मंदिराचे नावच आहे ‘इश्किया गणपती मंदिर’.
हे मंदिर राजस्थानमधील ऐतिहासिक शहर जोधपूर येथे वसलेले आहे. मारवाडची ओळख असलेल्या या शहरात किल्ले, महाल, हवेल्या, मंदिरांची परंपरा दीर्घकाळापासून जोपासली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर, शंभर वर्षांपूर्वी उभारलेले हे गणेश मंदिर आज विशेष चर्चेत आले आहे. गणेश चतुर्थीला येथे भव्य मेळा भरतो. पण या मंदिराची खरी ओळख म्हणजे येथे प्रेमीयुगुलांची होणारी गर्दी. स्थानिकांच्या मते, हे मंदिर अशा एकांत भागात बांधले गेले आहे जिथे बाहेरील लोकांची वर्दळ कमी असते. त्यामुळे येथे येणारे प्रेमी गुपचूप बाप्पाला आपली मनोकामना सांगू शकतात.
हे देखील वाचा : World Letter Writing Day 2025 : संवादाची हरवलेली पण अजूनही जिवंत असलेली कला म्हणजे हस्तलिखित पत्र
लोकविश्वास असा आहे की या मंदिरात गणपती बाप्पाला प्रार्थना केल्यावर प्रत्येक जोडप्याची प्रेमकहाणी यशस्वी होते. अनेकांनी येथे येऊन लग्न जमल्याचा अनुभव सांगितला आहे. म्हणूनच या मंदिराला ‘इश्किया गणपती मंदिर’ हे गोड नाव लाभले. गेल्या काही वर्षांत येथे तरुण जोडप्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. काही स्थानिक सांगतात की अनेक वर्षांपूर्वी काही प्रेमी जोडपे येथे भेटत असत आणि प्रार्थना करत असत. कालांतराने या परंपरेला इतके महत्त्व मिळाले की मंदिरच “प्रेमीयुगुलांचे तीर्थस्थान” बनले.
मंदिराशी जोडलेली आणखी एक रंजक मान्यता अशी आहे की, जर एखादी अविवाहित व्यक्ती येथे येऊन प्रार्थना केली, तर त्याच्या लग्नातील अडथळे दूर होतात. केवळ लग्नच नव्हे, तर आयुष्यातील इतर अनेक अडचणी, संकटे बाप्पा निवारण करतात असा श्रद्धाळूंचा ठाम विश्वास आहे.
या मंदिराची रचना अशी आहे की आत येणाऱ्या व्यक्तीला बाहेरून सहज पाहता येत नाही. त्यामुळे जोडप्यांना येथे गुप्तपणे भेटणे शक्य झाले. या विशेष रचनेमुळे मंदिराची ओळख “प्रेमाचे आश्रयस्थान” म्हणून झाली.
गणेश चतुर्थीच्या दिवशी येथे विशेष पूजा, आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. राजस्थानसह गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातूनही प्रेमीयुगुल येथे दर्शनासाठी येतात. मेळ्याच्या काळात वातावरण अत्यंत रंगतदार होते – भक्ती, प्रेम आणि उत्साह यांचा संगम अनुभवता येतो.
हे देखील वाचा : SCO Summit 2025: जग नवा अध्याय लिहिताना! ‘ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणे महत्वाचे’ शी जिनपिंग यांनी मोदींची केली प्रशंसा
आजच्या पिढीला हे मंदिर एक वेगळाच संदेश देते. आधुनिक काळात जिथे प्रेमसंबंधांबाबत अजूनही सामाजिक बंधने आहेत, तिथे गणेशासारखा विघ्नहर्ता देव स्वतः प्रेमाला आशीर्वाद देतो हे भक्तांना भावते. त्यामुळे या मंदिराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.गणेश हा केवळ अडथळे दूर करणारा देव नाही, तर नव्या सुरुवातींचा दाता आहे. जोधपूरच्या या इश्किया गणपती मंदिराने प्रेमाला पावित्र्याची जोड दिली आहे. त्यामुळे लग्नाचा विचार करणारे किंवा नात्यातील अडचणींना सामोरे जाणारे तरुण येथे श्रद्धेने येतात. भारतातील असंख्य गणेश मंदिरे भक्ती, परंपरा आणि अध्यात्म यांसाठी प्रसिद्ध आहेत; पण हे मंदिर प्रेमाला पवित्र रूप देणारे अनोखे स्थान ठरते.