(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा डे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून ग्रहमाख सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीची जवळची मैत्रीण सायली परब- शेलारने इन्स्टाग्रामवर हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या सोहळ्यात इशाने लाल काठ असलेली निळ्या रंगाची साडी परिधान केली असून तिच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत. सायली परब-शेलार इशाला मुंडावळ्या बांधताना दिसत असल्याने या फोटोंनी चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. इशा लग्नबंधनात अडकणार असल्याने तिचे चाहतेही उत्सुक झाले असून तिचा होणारा नवरा कोण असेल याबद्दलही चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, 2026 मध्ये अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसले आहेत. अलीकडेच ‘आई कुठे काय करते’ फेम अपुर्वा गोरेने लग्नगाठ बांधली असून अभिनेत्री रुमानी खरेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. आता अशातच आता इशा डेच्या लग्नाच्या बातम्या देखील चर्चेत आल्या आहेत.

(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
इशा डेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिला खरी ओळख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे मिळाली. या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली. त्याशिवाय तिने ‘अय्या’ आणि ‘गुलकंद’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः ‘गुलकंद’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि या भूमिकेसाठी तिला झी चित्र गौरव पुरस्कारमध्ये सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.
इशाचे खरे नाव इशा वडनेरकर असे आहे. मात्र, तिने परदेशात शिक्षण घेत असताना नाव बदलण्याचा निर्णय घेतला. ती लंडन स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत असताना ऑडिशनदरम्यान तिचे नाव उच्चारण्यात अडचण येत असल्यामुळे ट्युटरच्या सल्ल्यानुसार तिने ‘इशा डे’ हे सोपे नाव स्वीकारले. आता तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात होणार असून लग्नाआधीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.






