फोटो सौजन्य: गुगल
“प्रेम” या अडीच शब्दामुळे जगात चांगुलपणा आणि माणसातली माणुसकी अजूनही कायम टिकून आहे ,असं म्हणतात. असंही म्हटलं जातं की प्रेमामध्ये अख्खं जग जिंकण्याची ताकद असते.हे सांगण्याचं कारण म्हणजे फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आपल्या जवळच्या व्यक्तीबाबत नेमक्या आपल्या भावना काय आहे ? हे या निमित्ताने सांगण्यात याव्यात म्हणून अख्य जग 14 फ्रेब्रुवारीला प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघतं. शाहरुखच्या रोमॅंटीक फिल्ममध्ये असतं तसंच आपलंही आयुष्य असं प्रेममय असावं, असं प्रत्येक तरुण तरुणीला वाटत असतं. मात्र फिल्म आणि वास्तविक आयुष्य ही दोन विरुद्ध टोकं आहेत. बऱ्याचदा तरुण वर्ग प्रेमात पडतो पण प्रेम निभवावं कसं याबाबत काहीच माहित नसतं.
सहा वर्षांपुर्वी जग प्रेमात न्हाऊन निघत होतं त्याच दिवशी 14 फेब्रुबारी 2019 मध्ये पुलवामा शहर भारतीय जवानांच्या आणि निरपराध नागरिकांच्या रक्ताने न्हाऊन गेलं होतं. आजही हा दिवस आठवला तरी प्रत्येक भारतीयांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. काश्मीरमधल्या या भ्याड हल्यात अनेक सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. त्यातलंच एक नाव म्हणजे मेजर विभुती शंकर ढौंडियाल. डेहराडूनच्या विभूती यांचं लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचं स्वप्नं होतं आणि हे स्वप्न त्यांनी सत्यात देखील उतरवलं. त्यांच्या देशप्रेमाला घरच्यांबरोबर त्यांच्या पत्नी नितिका कौल-ढौंडियाल यांनी देखील तितकीच साथ दिली.
14 फेब्रुवारीला जैश-ए- मोहम्मद या दहशदवादी संघटनेने पुलवामा परिसरातून जात असलेल्या भारतीय सैनिकांच्या बसचा अपघात घडवून आणला. या भ्याड हल्ल्यामुळे सीमाभागातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. या दहशतवादी संघटनेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सलग 20तास भारतीय जवानांचं सर्च ऑपरेशन सुरु होतं. या दरम्यान पिंगलानमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार भारतीय सैनिकांना वीरमरण आलं. या शहीद झालेल्या जवानांमध्ये मेजर रँक अधिकारी विभूती ढौंडियाल देखील होते. विभूती शंकर यांच्या लग्नाला फक्त 10 महिने झाले होते. एप्रिलमध्ये नितिका आणि त्यांच्या लग्नाला वर्ष होणार होतं. मात्र त्याआधीच विभूती यांनी जगाचा निरोप घेतला.
National Women’s Day 2025: 13 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय महिला दिवस?
सर्वसाधारण असं म्हटलं जातं की, जोडीदार हा आयुष्यभराचा सोबती असतो. मात्र नितिका यांना त्यांच्या पतीची साथ फक्त 10 महिनेच मिळाली. विभूती ढौंडियाल यांना भारत शासनाने मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित केलं. पतीच्या जाण्यानंतर आपलं कसं होणार या विचाराने नितिका कोलमडल्या नाहीत. कारण नितिका फक्त विभूती शंकर यांच्या पत्नी नाहीत तर शहीद मेजर विभूती शंकर ढौंडियाल या भारताच्या वीरपुत्राच्या त्या वीरपत्नी आहेत. विभूती शंकर यांच्या पश्चात त्यांचं अपूर्ण राहिलेलं देशसेवेचं व्रत नितिका ढौंडियाल यांनी हाती घेतलं. नितिका आपल्या नशिबावर रडत नाही बसल्या, त्यांनी देशसेवेचा पवित्रा हाती घेत सैन्यात दाखल होण्याचा निर्धार केला.
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? जाणून घ्या त्यांनी नावे
सगळ्या खडतर आव्हानांना पेलत आज निकिता ढौंडियाल जनरल नेफ्टनंट म्हणून देशसेवेत कार्यरत आहेत. अनेक रोमॅंटीक सिनेमात किंवा तरुणांमध्ये एक वाक्य जोडीदाराला कायम म्हटलं जातं “मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही”. खरंतर प्रेम जीव द्यायला नाही तर प्रेम जगायला शिकवतं तेही अभिमानाने. जोडीदाराचं सोडून जाणं जीवघेणं दुख आहेच पण जोडीदाराच्या माघारी त्याचं राहिलेलं स्वप्न आपण पुर्ण करणं, आपण ते स्वप्नं जगणं हे सुद्धा प्रेमच असतं. प्रेमाची निस्वार्थ आणि निर्मळ जाणीव नितिका यांच्यामुळे जगाला पुन्हा नव्याने कळून आली. प्रेम मिरवणाऱ्य़ा या सोशल मीडीयाच्या जगात नितिका यांच्यासारखी प्रेम जपणारी माणसं असामान्य आहेत. आपल्या जोडीदाराची स्वप्न जपणं आणि जगणं हे सुद्धा प्रेमच आहे आणि प्रेम या जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे.अशा या देशसेवेच्या प्रेमाला नवराष्ट्रचा मानाचा सलाम..