World Turtle Day: कासवांसाठी उत्तर प्रदेश सरकारचा आदर्श उपक्रम; तीन शहरांमध्ये संवर्धन केंद्रे, प्रयागराजमध्ये विशेष अभयारण्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Sea Turtle Day : निसर्ग संवर्धनासाठी झपाट्याने कार्य करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारने जागतिक कासव दिनानिमित्त (२३ मे) एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली, राज्याने कासवांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. नद्यांचे नैसर्गिक स्वच्छता रक्षक असलेले कासव केवळ पर्यावरणीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत.
कासव ही प्राचीन काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेली प्रजाती असून ती नद्यांच्या परिसंस्थेचा अविभाज्य भाग मानली जाते. कासव पाण्यातील मृत जीव किंवा जैविक अवशेष खाऊन नैसर्गिक स्वच्छतेची प्रक्रिया पूर्ण करतात. त्यामुळे ते “नैसर्गिक स्वच्छता करणारे” प्राणी म्हणून ओळखले जातात.
भारतभरात कासवांच्या सुमारे ३० प्रजाती आढळतात, यातील १५ प्रजाती फक्त उत्तर प्रदेशात आढळतात. या प्रजातींपैकी काही ठळक नावं म्हणजे – कटहवा, मोरपंखी, साल, सुंदरी, ब्राह्मणी, कोरी पचेडा, तिलकधारी आणि पार्वती कासव. या जैवविविधतेचे संवर्धन हे सरकारच्या धोरणांचा केंद्रबिंदू ठरत आहे.
उत्तर प्रदेश सरकारने लखनऊमधील कुकरैल, वाराणसीमधील सारनाथ, आणि इटावामधील चंबळ क्षेत्रात कासव संवर्धन केंद्रे स्थापन केली आहेत. याबरोबरच २०२० मध्ये प्रयागराजजवळ ३० किमी क्षेत्रफळ असलेले विशेष कासव अभयारण्य उभारण्यात आले आहे. हे अभयारण्य प्रयागराज, मिर्झापूर आणि भदोही जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे आणि ते ‘नमामि गंगे’ योजनेअंतर्गत विकसित करण्यात आले आहे. या केंद्रांमधून केवळ संवर्धनच नाही, तर जनजागृती, पुनर्वसन आणि वैज्ञानिक अभ्यासालाही प्रोत्साहन दिले जाते. विविध राज्यांतून बेकायदेशीरपणे वाहतूक केलेली कासवे पकडल्यानंतर उत्तर प्रदेशात त्यांचे सुरक्षितपणे पुनर्वसन केले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्यता; इराणच्या ‘Hormuz’ सामुद्रधुनीवरून जोरदार संघर्षाची चिन्हे
कासवांच्या अवैध तस्करीवर सरकारने कडक कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश वन विभागाचे विशेष पथक राज्यभरात नजर ठेवून आहे. स्थानिक पोलिस आणि पर्यावरण संस्थांबरोबर समन्वय साधून, कासवांच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी संयुक्त मोहिमा राबविल्या जात आहेत. हिंदू धर्मात कासवाचे खास महत्त्व असून, त्याला भगवान विष्णूचा कूर्म अवतार मानले जाते. वास्तुशास्त्रातही कासवाला समृद्धी, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कासवांचे संवर्धन ही केवळ पर्यावरणाची गरज नसून ती सांस्कृतिक जबाबदारीही आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अनुराधा वेमुरी यांनी सांगितले की, “उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनुसार वन विभागाने कासवांच्या संवर्धनाला प्राधान्य दिले आहे. प्रयागराजमधील तीन मोठी केंद्रे आणि अभयारण्य हे दिशादर्शक पाऊल आहे.” आज उत्तर प्रदेश हे कासव संरक्षणात देशात आघाडीवरचे राज्य बनले आहे. सरकारने केवळ योजनांची घोषणा केली नाही, तर त्या प्रत्यक्षात उतरवल्या आहेत. नद्यांची स्वच्छता, पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेचे जतन या तिन्ही उद्दिष्टांसाठी कासवांची भूमिका मोलाची आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्रिटनचे ‘F-35B’ लढाऊ विमान भारतात उतरले; केरळमध्ये आपत्कालीन लँडिंगमागील नेमकं कारण काय?
जागतिक कासव दिनानिमित्त योगी सरकारचा हा संदेश स्पष्ट आहे – “निसर्गाशी नातं जपणं म्हणजेच टिकाऊ विकास”. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांमुळे इतर राज्यांनीही कासव संवर्धनाच्या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे. हा उपक्रम नदी संवर्धन आणि जैविक समतोलासाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, यात शंका नाही.