UK F‑35B emergency landing Kerala : ब्रिटनच्या नौदलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक ‘F-35B’ स्टेल्थ लढाऊ विमानाने शनिवारी रात्री केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. हे लँडिंग इंधनाअभावी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानाचे नियोजित उड्डाण रद्द करण्यात आले आणि जवळच्या सुरक्षित विमानतळावर उतरविण्यात आले.
हे लढाऊ विमान ब्रिटिश नौदलाच्या ‘HMS Prince of Wales’ या विमानवाहू युद्धनौकेशी संलग्न आहे. ही युद्धनौका सध्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रात तैनात असून, अलीकडेच भारतीय नौदलासोबत एक संयुक्त सैन्यसराव पूर्ण करून परतली आहे. या सरावानंतरही युद्धनौकेभोवती खराब हवामान असल्याने विमानाला आपल्या मूळ बेसवर परत जाता आले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
F-35B – पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमान
‘F-35B’ हे ‘शॉर्ट टेक-ऑफ अँड व्हर्टिकल लँडिंग’ (STOVL) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले जगातील एकमेव अत्याधुनिक लढाऊ विमान मानले जाते. ‘लॉकहीड मार्टिन’ या अमेरिकन कंपनीने विकसित केलेल्या या बहुउद्देशीय विमानात स्टेल्थ क्षमता, इलेक्ट्रॉनिक युद्ध कौशल्य आणि नेटवर्क-आधारित डेटा शेअरिंग तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. हे विमान विमानवाहू युद्धनौकेवरून थेट टेक-ऑफ व लँडिंग करू शकते, त्यामुळे त्याला अतिरिक्त प्रक्षेपण यंत्रणा लागत नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जर आमच्यावर हल्ला झाला तर अमेरिकन सैन्य…’, इराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्पची खामेनेईंना सक्त Warning
F-35 कार्यक्रम हा जगातील सर्वात मोठ्या व प्रगत लष्करी विमान प्रकल्पांपैकी एक मानला जातो. अमेरिका, ब्रिटन, इस्रायल व नाटो देशांनी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे. भारतासोबत ब्रिटनचे वाढते सैनिकी सहकार्य लक्षात घेता, हे विमान भारतीय हद्दीत उतरणे हे एक दुर्लभ परंतु महत्त्वपूर्ण घटनेचे प्रतिक मानले जात आहे.
ब्रिटनने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही
रविवारी सकाळपर्यंत हे लढाऊ विमान तिरुवनंतपुरम विमानतळावर सुरक्षितपणे उभे होते. स्थानिक यंत्रणांनी आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा उपाययोजना केल्या. मात्र, या घटनेबाबत ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडून किंवा लॉकहीड मार्टिन कंपनीकडून कोणतेही अधिकृत विधान अद्याप करण्यात आलेले नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलने अवकाशातच पाडले इराणी क्षेपणास्त्र; ‘Arrow 3’ प्रणालीने जगाला केले चकित
आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा
F-35 सारख्या लढाऊ विमानाचे भारतात उतरवणे म्हणजे केवळ तांत्रिक आपत्कालीन परिस्थिती नव्हे, तर भारताच्या भौगोलिक-सामरिक महत्त्वाचीही एक प्रकारची पावती आहे. हिंद महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व ब्रिटन यांसारख्या राष्ट्रांचे हिंद-प्रशांत क्षेत्रातील संलग्न सराव आणि उपस्थिती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा भारताच्या सामरिक सहकार्याचे आणि त्याच्या ‘रणनीतिक स्वायत्तते’चे महत्व अधोरेखित झाले आहे. पुढील काही दिवसांत ब्रिटनकडून अधिक स्पष्टता मिळेल, अशी शक्यता आहे.