डेहराडून : अटीतटीने झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान उत्तराखंड संघावर २-१ अशी मात केली आणि ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये पुरुषांच्या गटात बाद फेरीच्या अशा कायम राखल्या. ऑलिंपिकपटू आणि कर्णधार देवेंद्र वाल्मिकी याने दोन गोल करीत महाराष्ट्राच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यात वाल्मिकी याने चौदाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर द्वारा गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. या गोलच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या पंधरा मिनिटाच्या डावात आघाडी घेतली होती.
पाठोपाठ दोन मिनिटांनी महाराष्ट्राने आणखी एक गोल करीत आपली बाजू बळकट केली. हा गोल ही वाल्मिकी याने पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवीत नोंदविला. उत्तराखंड संघाने एक गोल केला. त्यांनी या सामन्यात बरोबरी साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु महाराष्ट्राच्या बचाव फळीने त्यांचे हे प्रयत्न असफल ठरविले. साखळी गटात महाराष्ट्राने दोन सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत सोडविला आहे. त्यांना शेवटच्या लढतीत हरियाणाविरुद्ध झुंजावे लागणार आहे. या लढतीवरच महाराष्ट्राच्या बाद फेरीच्या संधी अवलंबून आहेत.
गतवर्षी पाच सुवर्णपदकांसह गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजविणाऱ्या महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही जिम्नॅस्टिक्समध्ये धडाकेबाज सुरुवात केली. एक्रोबॅटिक आणि एरोबिक्स या दोन्ही प्रकारात महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठून आपला दबदबा कायम ठेवला. येथील भागीरथी संकुलात शनिवारपासून जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, हरियाणा आणि कर्नाटक या पाच राज्यातील संघ सहभागी झाले आहेत. महिला दुहेरीत ऋतुजा जगदाळे आणि निक्षिता खिल्लारे या जोडीने बॅलन्स सेटमध्ये नेत्रदीपक रचना सादर करून २१.११० गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला.
पुरुष दुहेरीत गणेश पवार आणि आदित्य कालकुंद्रे ही जोडी २१.७५० गुणांसह दुसरा स्थानावर राहिली. मिश्र दुहेरीत शुभम सरकटे आणि रिद्धी जयस्वाल जोडीने सर्वाधिक १९.०१० गुणांची कमाई केली. महिला गटात सोनाली कोरडे, आर्णा पाटील आणि अक्षता ढोकळे या महाराष्ट्राच्या त्रिकुटाने २२.३९० गुणांची कमाई करीत अपेक्षेप्रमाणे अव्वल स्थान मिळविले. पुरुष गटात रितेश बोखडे, प्रशांत गोरे, नमन महावर आणि यज्ञेश बोस्तेकर या जोडीने सर्वाधिक २३.६७० गुणांसह प्रथम स्थान मिळवीत महाराष्ट्राचा दरारा कायम ठेवला.
एरोबिक्स प्रकारातही महाराष्ट्राचाच दबदबा पाहायला मिळाला. या प्रकारातही महाराष्ट्राने महिला दुहेरी, पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला गट आणि पुरुष गटात नेत्रदीपक कामगिरी करीत सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. मिश्र दुहेरी श्रीपाद हराळ आणि मानसी देशमुख या जोडीला १५.१५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मिश्र तिहेरी आर्य शहा, स्मित शहा आणि रामदेव बिराजदार या त्रिकुटाने १६.२५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटात संदेश चिंतलवाड, स्मित शहा, अभय उंटवाल, उदय मधेकर, विश्वेश पाठक यांनी १५.८० गुणांसह पहिले स्थान मिळवित महाराष्ट्राचे वर्चस्व प्रस्तापित केले.