दासुन शनाका(फोटो:सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ३३ सामने खेळवण्यात आले आहेत. अशातच आता गुजरात टायटन्सकडून त्यांच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात संघात अष्टपैलू दासुन शनाकाचा समावेश करण्यात आला आहे. ग्लेन फिलिप्सच्या जागी दासून शानाकाला संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे संघात हा बदल करण्यात आला आहे.
गुजरात टायटन्सने दासुन शनाकाला ७५ लाख रुपयांच्या बेस प्राईसवर आपल्या संघात सामील करून घेतले आहे. दुखापतग्रस्त ग्लेन फिलिप्सच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. ज्याने या हंगामात अद्याप एकही सामना खेळला नाही. मेगा लिलावात गुजरात टायटन्सकडून ग्लेन फिलिप्सला २ कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते.
गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स मांडीच्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित आयपीएलमधून बाहेर जावे लागले आहे. फ्रँचायझीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. गुजरात टायटन्सने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ६ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान फिलिप्सला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती.
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू दासुन शनाका हा दुसऱ्यांदा गुजरात टायटन्स संघात सहभागी झाला आहे. २०२३ मध्ये, जेव्हा संघाची धुरा हार्दिक पंड्याकडे होती, तेव्हा शनाका त्या संघाचा एक भाग होता. त्यावेळी शनाकाला खेळण्याची तेवढी संधी मिळाली नव्हती. २०२३ मध्ये तो केवळ ३ सामनेच खेळू शकला होता.
फ्रँचायझी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर शनाका आयपीएलमध्ये सामील झाला. तो अलिकडेच इंटरनॅशनल लीग टी२० (ILT20) मध्ये दुबई कॅपिटल्सकडून खेळला आहे. तसेच त्याच्या संघाला विजेतेपद जिंकून देण्यास त्याने हातभार लावला आहे. त्याने १० डावांमध्ये २७ च्या सरासरीने १६४ धावा केल्या त्यासोबतच चार विकेट देखील घेतल्या.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ३३ वा सामना काल पार पडला. वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने १६२ धावा केल्या. यावेळी अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड यांची जादू चालली नाही. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १९ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केळे आणि विजय संपादन केला.