जगभरातील दिग्गज क्रिकेट संघांमध्ये भारतीय संघांचा (Team India) समावेश होतो. मात्र भारतीय संघाला यशाच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी अनेक भारतीय खेळाडूंनी योगदान दिले. यापैकी अनेक दिग्गज माजी खेळाडूंची कारकीर्द क्रिकेट रसिकांना आजही आठवते. त्यातील एक नाव म्हणजे भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumbale). आज म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचा वाढदिवस असून त्यांच्या कारकिर्दीतील एका दमदार खेळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
अनिल कुंबळे यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७० रोजी बंगळुरूमध्ये झाला होता. त्यांनी १९९० साली श्रीलंकेविरुद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. ते भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहे. त्यांनी एकूण ६१९ विकेट्स घेतल्या आहे. १८ वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळल्यानंतर कुंबळे यांनी २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कुंबळे यांच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. यापैकीच एक म्हणजे एकाच मॅचमध्ये कुंबळे यांनी पाकिस्तानच्या १० खेळाडूंच्या घेतलेल्या विकेट्स.
पाकिस्तानी संघाला एकट्याने केले सर्वबाद :
आपल्या कारकिर्दीत कुंबळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये जेवढे यशस्वी ठरले त्यापेक्षा अधिक ते कसोटी क्रिकेटमध्ये गाजले. १९९९ मध्ये फिरोजशाह कोटलाच्या मैदानावर कुंबळे यांनी जे केले त्याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हते. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी पाकिस्तानचे सर्व १० विकेट्स घेत विश्वविक्रम केला. तेव्हा ४२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ एकही विकेट न गमावता १०१ धावांवर खेळत होता, पण कुंबळे यांनी एकापाठोपाठ एक पाकिस्तानच्या फलंदाजांना बाद केल्याने भारताने हा सामना २१२ धावांनी जिंकला होता.
कुंबळे यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये, २७१ सामन्यांमध्ये २३७ विकेट घेतल्या आहे. आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये अनेक सामन्यांमध्ये त्यांनी टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. १९९३ मध्ये खेळल्या गेलेल्या हिरो चषकाच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार गोलंदाजी करत ६ विकेट्स घेतल्या. तर एका क्षणी ४ बाद १०१ धावांवर असलेल्या कॅरेबियन संघाचा डाव त्यांनी १२३ धावांत आटोपला होता.