कल्याण : १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान प्रथम कॉमनवेल्थ मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबई महानगरपालिकेमध्ये सहा. क व स. (एन) विभागात कार्यरत असलेले आत्माराम गांगर्डे यांनी भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व करत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या तिन्ही प्रकारात ब्राँझ मेडल पटकावले. अशाप्रकारे तिन्ही प्रकारात कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत त्यांनी सदर स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.
त्यांना पुरुष दुहेरी मधील जोडीदार अशोक कळंबे (नागपूर) व मिश्र दुहेरी मधील जोडीदार मनीषा प्रधान (मुंबई) यांची मोलाची साथ लाभली. आत्माराम गांगर्डे हे नगर जिल्ह्यातील निमगाव (गांगर्डा) या खेडेगावातील मूळ रहिवासी आहेत आणि सध्या कल्याण येथे नोकरी निमित्त स्थायिक आहेत. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांनी निमगाव (नगर) व मोहने (कल्याण) या गावांचे नाव अटकेपार नेले. त्यांनी या खेळाची सुरुवात इयत्ता ५ वी च्या वर्गात १० वर्षाचे असताना पासून एन.आर.सी. स्पोर्ट्स क्लबमध्ये केली.
त्यांना खेळाचा वारसा घरातूनच त्यांच्या मोठ्या भावंडाकडून मिळाला होता. मोठा भाऊ उत्तम क्रिकेट खेळाडू तर दुसरा राज्यस्तरीय धावपटू होता. त्यामुळे घरातील वातावरण खेळासाठी पोषक होते. त्यांनी शालेय व राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत, सतत ७ वर्ष महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच ब्राझील, स्वीडन, चीन, इंडोनेशिया, अमेरिका, मंगोलिया व ओमान येथील जागतिक मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उत्तम कामगिरी केली.
अशा त्यांच्या नेत्रादिपक कामगिरी बद्दल सुभाष पाटील अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ मोहने, सामाजिक कार्यकर्ते रवी गायकवाड व परिसरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार आयोजित करून त्यांचा गौरव केला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना गांगर्डे यांनी टेबल टेनिससाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा आणि त्यातून देशासाठी खेळाडू तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच मतिमंद आणि अपंग मुलांसाठी, खेडेगावातील व तळागाळातील गरीब मुलांना या खेळाबाबत आवड निर्माण करून त्यातून उत्तम खेळाडू घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.