AUS W (Photo Credit- X)
ICC Fined Australia Women’s Team: बुधवारी ऑस्ट्रेलिया महिला संघाला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना भारताकडून १०२ धावांनी हार पत्करावी लागली, ज्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली गेली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे, कारण दुसऱ्या वनडे सामन्यात धीम्या गोलंदाजीमुळे आयसीसीने त्यांच्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
दुसऱ्या वनडेमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियन महिला संघावर मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत दोन ओव्हर्स कमी टाकल्याने ऑस्ट्रेलियाला आयसीसीने दंड केला. नियमांनुसार, निर्धारित वेळेत गोलंदाजी पूर्ण न केल्यास प्रत्येक कमी ओव्हरसाठी खेळाडूंच्या मॅच फीमधून ५ टक्के रक्कम कापली जाते. हा निर्णय मैदानावरील पंच वृंदा राठी आणि जननी नारायणन, तिसरे पंच लॉरेन एजेनबैग आणि चौथे पंच गायत्री वेणुगोपालन यांनी घेतला.
Australia have been fined for maintaining a slow over-rate in the second ODI against India.#INDvAUShttps://t.co/EdbX7vgu4t
— ICC (@ICC) September 19, 2025
या सामन्यात भारतीय महिला संघाकडून स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी केली. तिने ११७ धावांची अप्रतिम खेळी साकारली, जे तिच्या वनडे कारकिर्दीतील १२ वे शतक होते. तिच्याशिवाय दीप्ती शर्मानेही ४० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्मृती आणि दीप्तीच्या खेळीमुळेच भारतीय संघाने २९२ धावांचा डोंगर उभा केला.
ऑस्ट्रेलियासाठी एलिस पेरी (४४ धावा) आणि एनाबेल सदरलँड (४५ धावा) यांनी चांगली फलंदाजी केली, परंतु त्यांच्या इतर खेळाडू खास कामगिरी करू शकल्या नाहीत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ १९० धावांत गारद झाला. भारताकडून क्रांती गौडने सर्वाधिक तीन बळी घेतले.
दुसरा वनडे सामना जिंकून भारतीय महिला संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना २० सप्टेंबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे मालिकेचा विजेता निश्चित होईल.