फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Mitchell Starc retirement : मिचेल स्टार्कने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०१२ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपात पदार्पण केले. आता १३ वर्षांनंतर त्याने निरोप घेतला आहे. मिचेल आता निवृत्त होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मिचेल स्टार्कने 2025 मध्ये चांगली कामगिरी केली आहे पण आता अचानक टी-२० क्रिकेटमधून निरोप घेऊन सर्वच चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. मिचेलने आता यामागील कारण सांगितले आहे.
मिचेल स्टार्कने T20 क्रिकेटमधून का घेतली निवृत्ती?
मिशेल स्टार्कने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तो भारताविरुद्धच्या मालिकेसाठी, एकदिवसीय विश्वचषक आणि अॅशेससाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवू इच्छितो. म्हणूनच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देणे योग्य मानले. त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माझे लक्ष आता टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी दौऱ्यावर, अॅशेस आणि २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. मला वाटते की हे (टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती) माझ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आणि ताजेतवाने राहण्याचा सर्वोत्तम मार्ग होता. यामुळे गोलंदाजी गटाला टी-२० विश्वचषकापूर्वीच्या सामन्यांसाठी तयारी करण्याची चांगली संधी मिळेल.’
मिचेल स्टार्कने त्याच्या टी-२० कारकीर्दमध्ये धूमाकुळ घातला आहे आणि त्याने त्याच्या गोलंदाजीने अनेक वेळा संघाला विजय मिळवून दिला तो गणना ही ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. तथापि, ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय वेळ २०२१ चा विश्वचषक होता. तो म्हणाला, ‘कसोटी क्रिकेट नेहमीच माझे प्राधान्य राहिले आहे. मी ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या सर्व टी-२० सामन्यांपैकी प्रत्येक मिनिट मला आवडला आहे, विशेषतः २०२१ चा विश्वचषक. आम्ही तो सामना जिंकलो म्हणूनच नाही तर यावेळी आमचा संघ उत्तम होता आणि आम्ही खूप आनंद यावेळी घेतला होता.’
मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने गोलंदाजी करताना २३.८१ च्या सरासरीने ७९ विकेट्स घेतल्या आणि त्याची कारकिर्दीतील इकॉनॉमी ७.७४ होती. स्टार्कने एकदा टी-२० मध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल. तथापि, स्टार्कचा पर्याय शोधण्यासाठी त्यांच्याकडे अजूनही पुरेसा वेळ आहे.