बाबर आझम(फोटो-सोशल मीडिया)
Babar Azam BBL debut : पाकिस्तानी क्रिकेट संघातील स्टार खेळाडू बाबर आझम आता बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. बाबर सिडनी सिक्सर्सच्या गुलाबी (मॅजेंटा) जर्सीमध्ये दिसणार आहे. १४ डिसेंबर रोजी हंगामाच्या पहिल्या सामन्यापूर्वी सिडनीमध्ये पोहोचून त्याने आपली उपस्थिती दर्शवली आहे. या सामन्यात सिडनी सिक्सर्सचा सामना पर्थ स्कॉर्चर्सशी होणार आहे.
स्वतः सिडनी सिक्सर्सने बाबरच्या सिडनीमध्ये आगमनाबाबतची बातमी दिली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याबाबत बातमी शेअर केली आहे. संघाने लिहिले आहे की, “सिडनीमध्ये आपले स्वागत आहे, बाबर आझम.”
बाबर आझमने सिडनीमध्ये दाखल झाल्यानंतर, त्याने या आठवड्याच्या शेवटी मॅजेंटा जर्सीमध्ये खेळण्याबद्दल आपला उत्साह व्यक्त केला. बाबरने स्पष्ट केले आहे की, तो पर्थसारख्या वेगवान खेळपट्टीवर फलंदाजी करण्यास खूप उत्सुक आहे. त्याच्या आगमनामुळे सिडनी सिक्सर्सला मैदानावर चांगलीच बळकटी मिळेले असे मानले जात आहे. शिवाय संघाच्या चाहत्यांची संख्या आणि प्रेक्षकसंख्या देखील लक्षणीयरीत्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सिडनी सिक्सर्सने बाबर आझमसाठी एक अनोखा उपक्रम देखील सुरू केला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) येथे त्याच्या नावाने एक समर्पित असलेले स्टँड देखील बांधण्यात आला आहे, ज्याचे नाव “बाबरिस्तान” ठेवण्यात आले आहे. संघाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की बाबरिस्तानचा उद्देश उत्साही चाहत्यांना उच्च-ऊर्जेच्या वातावरणामध्ये एकत्र करणे आहे. हे ठिकाण केवळ बाबरच्या कट्टर समर्थकांसाठीच असणार नाही तर क्रिकेट आणि दक्षिण आशियाई संस्कृतीचा उत्साह जवळून अनुभवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी देखील असणार आहे.” असे म्हटले आहे.
सिडनी सिक्सर्सकडून जाहीर करण्यात आले आहे की, १७ डिसेंबर रोजी बाबरिस्तान येथे होणाऱ्या घरच्या सामन्याची तिकीटांची आधीच विक्री झाली आहे. तथापि, संघाच्या उर्वरित घरच्या सामन्यांची तिकिटे अजून देखील उपलब्ध होत आहेत. क्लबने चाहत्यांना बाबरिस्तानचा भाग होण्याचे आणि आंतरराष्ट्रीय सुपरस्टार बाबर आझमने संघात आणलेल्या वातावरणाचा अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे.






