जहानारा आलम(फोटो-सोशल मीडिया)
Sexual harassment case of female cricketers in Bangladesh : बांगलादेश महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार जहांआरा आलमकडून संघाचे माजी मुख्य निवडकर्ता आणि व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. या घटनेने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून (बीसीबी) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. बोर्डाने समितीला १५ कामकाजाच्या दिवसांत आपला अहवाल आणि शिफारसी सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
बीसीबीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की महिला क्रिकेट संघाच्या माजी सदस्याकडून करण्यात आलेल्या आरोपांवर बोर्ड गंभीर चिंता व्यक्त करत आहे. निवेदनात असे देखील म्हटले आहे की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून म्हणूनच, वस्तुस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी बोर्डाने एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे. खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, आदरयुक्त आणि व्यावसायिक वातावरण राखण्यासाठी ते वचनबद्ध असल्याचे आश्वासन बोर्डाकडून देण्यात आले आहे आणि तपासाच्या निकालांवर आधारित निर्णायक कारवाई करणार आहे.
जहानारा आलमकडून अलीकडेच एका माध्यम मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे की, संघ व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांनी त्यांच्याशी अनुचित असे वर्तन केले होते. त्यांच्या मते, ते परवानगी न घेता त्यांच्या खांद्यावर हात ठेवत असत आणि वैयक्तिक टिप्पणी करत असत ज्यामुळे त्यांना नेहमी अस्वस्थ वाटत असे. त्यांनी असे देखील म्हटले की मंजरुल इस्लाम हे त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याऐवजी मिठी मारत असत, बहुतेकदा इतर संघ खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे घडत असे.
जहानाराने पुढे सांगितले आहे की, त्यांनी या घटनेची तक्रार बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी संचालक शफिउल इस्लाम नादेल आणि बोर्डाचे सीईओ निजामुद्दीन चौधरी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून समिती पुढील दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे.
जहानारा आलम बांगलादेशच्या सर्वात आदरणीय आणि प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिने देशासाठी ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०.३९ च्या सरासरीने ४८ विकेट्स चटकावल्या आहेत. तसेच ८३ टी-२० सामन्यांमध्ये २४.०३ च्या सरासरीने ६० विकेट्स काकढल्या आहेत. भारतातील महिला टी-२० चॅलेंज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेअरब्रेक इन्व्हिटेशनल टी-२० स्पर्धेत भाग घेणारी ती एकमेव बांगलादेशी खेळाडू ठरली आहे.






