भारतीय महिला संघाने जिंकला विश्वचषक(फोटो-सोशल मीडिया)
लखन शोभा बाळकृष्ण/पुणे : भारतीय महिला क्रिकेट विश्वात २ नोव्हेंबर २०२५ या दिवशी सुवर्णाध्याय कोरला गेला. याचं कारण ठरलं महिला एकदिवसीय विश्व चषक. नवी मुंबईत झालेल्या या सामन्याकडे संपूर्ण विश्वाचे लक्ष लागले होते. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या जेतेपदाच्या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाला धूळ चारली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरले.
यापूर्वी भारत दोन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता, पण जेतेपदाला गवसणी घालता आली नाही. अखेर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने इतिहास घडवला. भारतीय महिला क्रिकेट ही अनेक स्थित्यंतरातून मार्गक्रमण करत आली आहे. अनेक चढउतार पाहत ‘चूल आणि मूल’ या चौकटीला छेद देत महिला आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मैदानात उतरू लागल्या, त्याचा परिणाम म्हणजे म्हणजे आयसीसी महिला विश्वचषकाचे जेतेपद आपल्या नावे करणे होय. त्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचं काम करणाऱ्या या जेतेपदाने भारतीय महिला क्रिकेटला काय दिले? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारतीय महिला संघाने साखळी सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध विजय मिळवला. मात्र, त्यांना ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करत विजयाची भूक दाखवून दिली. आपल्या चुकांमधून शिकत उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी भारतीय महिला संघाला “मोठ्या धावसंख्येचा विचार न करता ऑस्ट्रेलियापेक्षा एक धाव जास्त काढायची आहे.” असा उर्जावान संदेश दिला. इथूनच विजयाची मानसिकता तयार झाली.
माजी क्रिकेटपटु झुलन गोस्वामी, डायना एडुलजी, मिताली राज, अंजुम चोप्रा, नितु डेव्हिड, शर्मिला चक्रवर्ती, या दिग्गज खेळाडूंनी देशासाठी भरपूर क्रिकेट खेळले, आपल्या खेळाने भारतीय क्रिकेटला महत्व प्राप्त करून दिले. परंतु, त्यांना जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आली नाही. मात्र, हरमनप्रीत कौर आर्मीने या दिग्गजांचे स्वप्न सत्यात उतरवले. कर्णधार कौरने विजय साजरा करण्यापूर्वी झुलन गोस्वामीच्या हातात ट्रॉफी दिली, त्यामुळे झुलनला अश्रू अनावर झाले होते. झुलन गोस्वामी, मिताली राज आणि अंजुम चोप्रा, जे समालोचन करत होते. भारतीय संघाने या तीन माजी खेळाडूंना या विजयाच्या उत्सवात समाविष्ट करून घेतले आणि त्यांना ट्रॉफी उचलण्याचा मान दिला. एकूणच या जेतेपदाने दिग्गजांची स्वप्नपूर्ती झाली.
ज्या देशात क्रिकेट श्वास आहे, तिथे महिलांच्या क्रिकेटकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते, परंतु याच पोरींनी आता सारी मिथके तोडली. स्टेडियम खच्चून भरलं होतं. लाइव्ह स्ट्रीमिंगवर देखील कोट्यवधी लोक सामना पाहत होते. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, रोहित शर्मा यासारखे दिग्गज देखील स्टेडियममध्ये आपल्या मुलींचा खेळ पाहत बसले होते. ज्यावर कुणाचं नियंत्रण नाही, जे जन्मजात मिळतं त्या स्त्री सौंदर्यावर भरभरून रकाने लिहिणारा समाज आता तिने कष्टाने विकसित केलेल्या कौशल्यावर, तिच्या क्षमतेवर चर्चा करू लागला, हीच भारतीय महिला क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची नांदी आहे.
या स्पर्धेत हरमनप्रीत कौर या अनुभवी खेळाडूने कणखरता, नेतृत्व आणि फलंदाजीने तिचे संघातील स्थान स्पष्ट केलं. या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड (५७१ धावा) नंतर स्मृती मानधना ४३३धावा करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रतीका रावलने देखील छाप पाडली. तसेच, शेफाली वर्माला मिळालेल्या संधीत तिने अंतिम सामन्यात धावाच(८७ धावा )नाही तर गोलंदाजीने(२बळी) देखील स्वत:ला सिद्ध केले. अष्टपैलू दिप्ती शर्माने फलंदाजी(२१५) आणि गोलंदाजीमध्ये(२२ बळी) योगदान देत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.ऋचा घोष आणि अमनजोत कौर यांची विजय खेचून आणण्याची क्षमता, राधा यादव, क्रांती गौड, रेणुका ठाकूर, श्री चरणी यांची गोलंदाजी या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या जमेच्या बाजू ठरल्यात. एकूणच, भारतीय महिलांनी दाखवून दिले की भारतीय महिला संघ कशातच कमी नसून तो देखील जगज्जेता होऊ शकतो. या विजयाने भारतीय जनमाणसात महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील निराशेची काजळी दूर होऊन तिच्या भरारीला अधिक उंची मिळेल हे नक्की.






