राज्य सरकारकडून विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचा सन्मान(फोटो-सोशल मीडिया)
Women’s ODI World Cup 2025 : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास घडवला आहे. भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका संघाचा ५२ धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावले. या विजयानंतर, प्रत्येक खेळाडूचा सन्मान करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती, की महाराष्ट्र सरकार जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मानधना आणि राधा यादव यांना बक्षिस रोख रक्कम देऊन सन्मान केला जाईल. या घोषणेची पूर्तता करण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी २.२५ कोटी रुपये बक्षीस देण्यात आले आहे.
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत संघातील खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव तसंच प्रशिक्षक अमोल मुजुमदार(२२.५ लाख) यांचा मानधन स्वरूपात सन्मान केला गेला. त्याचप्रमाणे माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी आणि सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा देखील भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आला आहे. जेमिमाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावा केल्या होत्या. तर स्पर्धेत स्मृती भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. राधा सेमीफायनल आणि फायनल दोन्हीमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये होती.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत लिहिले की, “भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकून देशाचं नाव जगभर उज्ज्वल केलं आहे. हा विजय फक्त क्रिकेटमधला नाही, तर प्रत्येक भारतीयासाठीच्या अभिमानाचा क्षण आहे. महिला क्रिकेट संघानं मनं आणि हृदयं दोन्ही जिंकली आहेत. १९८३ साली श्री. कपिल देव यांनी देशाला मिळवून दिलेलं विश्वविजेतेपद आज आपल्या महिला क्रिकेटपटूंनी नव्या पर्वात नोंदवलं आहे. हा दिवस म्हणजे पुन्हा एकदा दिवाळीचा उत्सवच!” पुढे त्यांनी लिहिल की, “ग्रामीण भागातील अनेक मुलींना या यशानं प्रेरणा मिळेल. योग्य संधी मिळाल्यास त्या देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात, याचा मला मनापासून अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!”






