ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
BCCI announces new rules : इंग्लंड आणि भारत यांच्या नुकतीच ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या खेळाडूंना दुखापतींनी घेरले होते. लॉर्ड्स कसोटी दरम्यान ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. त्यामुळे बीसीसीआयकडून या सर्व गोष्टींचा विचार करून एक मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयकडून आगामी देशांतर्गत स्पर्धांसाठी एक नवा नियम तयार करण्यात आला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मल्टी डे सामन्यासाठी एक नवा ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ चा नियम आणला आहे. हा नियम २०२५-२६ स्पर्धेपासून लागू करण्यात येणार आहे. मैदानात एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याची रिप्लेसमेंट आता या नियमानुसार लगेच दिली जाणार आहे. ऋषभ पंतला चौथ्या सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या नियमानुसार, जर एखादा खेळाडू मल्टी डे सामन्यादरम्यान दुखापत होऊन गंभीर जखमी झाला आणि त्यावेळी त्याला सामन्याबाहेर जावं लागले तर टीम व्यवस्थापन एक समान क्षमता असलेला खेळाडू रिप्लेस करून मैदानात पाठवू शकतो. ही रिप्लेसमेंट तात्काळ लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी निवड समिती आणि सामनाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या नियमामुळे संघाच्या रणनितीवर कोणताही फरक पडणार नाही. तसेच खेळाचा दर्जा देखील कायम राहण्यास मदत होईल. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या पंचांच्या सेमिनारमध्ये पंचांना या नव्या नियमाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली तर निर्णय तात्काळ हा नियम लावून निर्णय घेता येणे सोपे होणार आहे.
या नवीन नियमानुसार, खेळाडूला खेळताना मैदानावर गंभीर दुखापत झाली, तर यावेळी संघ व्यवस्थापन त्याच्या जागी रिप्लेसमेंटची मागणी करू शकते. तेव्हा दुसरा फलंदाज फलंदाजाची जागा घेईल किंवा गोलंदाज गोलंदाजाची जागा घेईल. नाणेफेकीपूर्वी संघाने घोषित पर्यायी खेळाडूंमधून हा खेळाडू निवडला जाणार आहे. पण जर विकेटकीपरला दुखापत झाल्यास आणि संघात दुसरा विकेटकीपर नसेल, तर सामनाधिकारी संघाला बाहेरील कीपरला बोलावण्याची परवानगी देखील देऊ शकतात.
हेही वाचा : नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये याअशा बदलीची मुभा असणार नाही. सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे स्पर्धेसाठी हा नियम लागू असणार नाही. आयपीएल स्पर्धेत हा नियम लागू होईल की नाही याबाबत अद्याप कोणती स्पष्टता देण्यात आली नाही.