Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तानने या स्पर्धेत केलेल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले. काही वर्षांपूर्वीच क्रिकेट विश्वात पाऊल ठेवलेल्या अफगाणिस्तानने अगदी कमी वेळात मोठा पल्ला गाठला आहे. त्यांनी पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत आता प्रवेश केला आहे.
वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानची दमदार कामगिरी
या स्पर्धेत अफगाणिस्तानने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करण्याचा कारनामा केला आहे. इतकेच नाही, तर 2023 वनडे वर्ल्ड कपमध्येही अफगाणिस्तानने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे अफगाणिस्तान करत असलेल्या प्रगतीबद्दल सध्याचा त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान अफगाणिस्तानच्या या आजपर्यंतच्या यशात भारत आणि बीसीसीआयचीही मोठी मदत झाली आहे. ही मदत कशी झाली, त्यावर एक नजर टाकू.
अफगाणिस्तानचे क्रिकेटविश्वात नुकतेच पाऊल
तर, अफगाणिस्तानने जेव्हा नुकतेच क्रिकेटविश्वात पाऊल टाकलेले होते आणि ते आपलं नाव बनवू इच्छित होते, त्यावेळी भारताने पुढाकार घेत त्यांना मदतीचा हात दिला होता. साल 2015 मध्ये अफगाणिस्तान संघासाठी भारतात सराव करीत होता. अफगाणिस्तानसाठी ग्रेटर नोएडामधील शाहिद विजय सिंग पाठीक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्यांचे तात्काळ घरचे मैदान झाले होते. तसेच अफगाणिस्तानने नंतर शारजामध्ये त्यांना तळ हालवला होता. पण 2017 मध्ये अफगाणिस्तान आयर्लंडविरुद्ध ग्रेटर नोएडा येथे आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते.
इतकेच नाही, तर डेहराडूनमध्येही अफगाणिस्तानने घरचे मैदान म्हणून बांगलादेशविरुद्ध टी20 मालिका खेळली होती. म्हणजेच ज्या ज्यावेळी अफगाणिस्तानला सुविधांची गरज होती, त्यावेळी भारतातील राज्य संघटना आणि बीसीसीआय यांनी पुढाकार घेतला होता.
भारतीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
याशिवाय गेल्या काही वर्षात भारतीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन अफगाणिस्तानला लाभले आहे. लालचंद राजपूत, मनोज प्रभाकर आणि अजय जडेजा हे यापूर्वी अफगाणिस्तानच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिले आहेत. अजय जडेजा यांनी 2023 वनडे वर्ल्ड कपदरम्यान अफगाणिस्तान संघाचे मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी कोणतेही मानधन घेतले नव्हते.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही अफगाणिस्तानचे खेळाडू
इतकेच नाही तर भारतातील एक मोठी टी20 क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही अफगाणिस्तानचे अनेक खेळाडू खेळतात. त्यामुळे त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी तर मिळतेच, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्याही मदत मिळते.
आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या राशिद खान, मोहम्मद नबी, रेहमनुल्लाह गुरबाज, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी अशा अनेक खेळाडूंना संधी मिळाली आहे. एकूणच विचार करायचा झाल्यात अशा अनेक गोष्टींमुळे कळत-नकळत भारत आणि बीसीसीआयची मोठी मदत अफगाणिस्तानला झाल्याचे दिसून येत आहे.