स्मृती मानधनाला आणि लॉरा वोल्वार्ड्ट(फोटो-सोशल मीडिया)
Latest ICC Rankings announced : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने आपली प्रभावी कामगिरी दाखवत विजय मिळवला. परंतु, भारतीय स्टार फलंदाज स्मृती मानधनाला मोठा झटका बसला आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर झाला असून दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने मानधनाला मागे टाकत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मानधना आता दुसऱ्या स्थानावर घसरली असून तर अॅशले गार्डनर तिसऱ्या स्थानावर विराजमान झाली आहे.
विश्वचषकामध्ये लॉरा वोल्वार्ड्टने शानदार फलंदाजी केली आहे. तिने विश्वचषकाच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात शतके झळकावली आहे. तिच्या दमदार कामगिरीचा थेट परिणाम रँकिंगवर दिसून आला. तीला दोन स्थानांचा फायदा होऊन तिने पहिल्यांदाच एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, स्मृती मानधना उपात्य आणि अंतिम सामन्यात अपयशी ठरली आणि तिचे नंबर १ स्थान तीला गमवावे लागले.
जरी मानधनाच्या क्रमवारीत घसरण झाली असली तरी, उर्वरित भारतीय खेळाडूंसाठी ही क्रमवारी फायद्याची ठरली आहे. उपांत्य फेरीत शानदार शतक झळकावणारी जेमिमा रॉड्रिग्ज नऊ स्थानांनी पुढे सरकून पहिल्यांदाच टॉप १० मध्ये प्रवेश मिळवला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील चार स्थानांनी प्रगती साधत १४ व्या स्थानावर विराजमान झाली आहे. तसेच अष्टपैलू दीप्ती शर्माने तीन स्थानांनी प्रगती करत ती आता २१ व्या स्थानावर पोहचली आहे. युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने देखील तिच्या क्रमवारीत सुधारणा केली असून तिने चार स्थानांनी प्रगती साधली असून ती ३० व्या स्थानावर पोहचली आहे.
अंतिम फेरीत आपल्या अष्टपैलू कामगिरीने प्रभावित करणाऱ्या दीप्ती शर्माने अष्टपैलूच्या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती केली आहे आणि आता ती चौथ्या स्थानावर आहे. टॉप २० मध्ये दीप्ती ही एकमेव भारतीय ऑलराउंडर विराजमान आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत देखील तिची कामगिरी स्थिर राहिली आहे. ती पाचव्या स्थानावर असून इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन गोलंदाजीमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. तिने स्थान कायम ठेवले आहे. दरम्यान, भारताची उदयोन्मुख गोलंदाज श्री चरणी सात स्थानांची झेप घेत. २३ व्या स्थान पटकावले आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. असे असले तरी, वैयक्तिक रँकिंगमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. स्मृती मानधना अव्वल स्थानावरून घसरली असली तरी, भारतीय खेळाडूंच्या सामूहिक कामगिरीने जागतिक क्रिकेटमध्ये देशाचे स्थान अधिक बळकट केले आहे.






