मेलबर्न : आज टी २० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन संघ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तान संघासाठी अनेक चढ उतार आले. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तानचा संघ, यंदाच्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर जाता जाता अंतिम फेरीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियामधील १९९२ मध्ये खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वकरंडकातसुद्धा पाकिस्तान संघाची अशीच स्थिती होती. मात्र त्या विश्वचषकातही पाकिस्तान संघाने अंतिम फेरी गाठली होती.
सध्या सुरू असणाऱ्या विश्वचषकात १९९२ च्या स्पर्धेमध्ये बरेच साम्य असून “आता जर पाकिस्तानचा संघ विजयी झाला, तर बावर आझम पुढे जाऊन इम्रान खानप्रमाणे देशाचा प्रधानमंत्री होईल,” असा टोला भारताचे दिग्गज कसोटी फलंदाज सुनील गावसकर यांनी लगावला आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने १९९२ मधील एकदिवसीय विश्वकरंडक जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर बरोबर २६ वर्षांनी ते पाकिस्तानचे प्रधानमंत्री झाले, त्यामुळे असेच बाबर बाबतीतसुद्धा घडू शकते, असे गावसकर यांनी म्हटले आहे
‘इम्रान यांच्या खांद्यावर १९९२ मध्ये पाकिस्तानच्या संघाची धुरा होती आणि त्यांनी विश्वकरंडक जिंकला होता. तेव्हासुद्धा भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. डावखुरा जलदगती गोलंदाज वसिम आक्रमने १९९२ मधील स्पर्धेत देशातर्फे सर्वांत जास्त गडी टिपले होते, तर यंदाच्या स्पर्धेतही जलदगती गोलंदाज असणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने संघातर्फे सर्वांत जास्त गडी बाद केले आहेत.






