गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, ISIS काश्मीरने ईमेलद्वारे पाठवली धमकी (फोटो सौजन्य-X)
Gautam Gambhir death threat News in Marathi: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गंभीरला ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली असून या ईमेलमध्ये फक्त तीन शब्द लिहिले होते, I Kill You…, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊया…
गौतम गंभीरला ईमेलद्वारे मिळालेल्या धमकीनंतर ताबडतोब पोलिसांना या ईमेलबद्दल माहिती दिली आणि अधिकृतपणे तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी ही तपास सुरु केला. सुरुवातीच्या तपासानुसार ही धमकी आयसिस काश्मीरने दिल्याची माहिती समोर आली.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी सायबर सेल टीम ईमेल ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. हा ईमेल कोणी आणि कुठून पाठवला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राजिंदर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, गौतम गंभीरच्या कार्यालयाने माहिती दिली की गौतम गंभीरला ‘आयएसआयएस काश्मीर’ कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी त्यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबत तक्रार केली. यासोबतच त्यांनी त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याची मागणीही केली आहे.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे एक निवेदन आले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आम्हाला एका ईमेलची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये गौतम गंभीरला धमकी देण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. गंभीर आधीच दिल्ली पोलिसांच्या संरक्षणात आहे. त्याच्या सुरक्षेशी संबंधित विशिष्ट माहिती आम्ही सार्वजनिक करू शकत नाही.
Praying for the families of the deceased. Those responsible for this will pay. India will strike. #Pahalgam
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 22, 2025
धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ एप्रिल रोजी गौतम गंभीरला ईमेलद्वारे दोनदा धमक्या मिळाल्या, एकदा दुपारी आणि दुसरी संध्याकाळी. दोन्ही मेलमध्ये फक्त तीन शब्द लिहिले होते: ” I Kill You… “. गंभीरला अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबर २०२१ मध्ये, जेव्हा ते खासदार होते, तेव्हा त्यांना असाच एक मेल आला होता.
गौतम गंभीरने मंगळवारी ट्विटरवर (पूर्वी X) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. गंभीरने X वर लिहिले होते – जे लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. जे याला जबाबदार आहेत, त्यांना याची किंमत चुकावावी लागेल, भारत उत्तर देईल. या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा जीव गेला. ज्यात असंख्य पर्यटक होते. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.