टिम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या दोन्ही संघात पाच कसोटी सामने खेळले जात आहेत. त्यातील पहिली कसोटी लीड्स येथे पार पडली. या सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडने ५ विकेट्सने पराभव केला आहे. इंग्लंडने सामन्याच्या शेवटच्या डावात भारताने विजयासाठी दिलेल्या ३७१ धावा पार करुन इतिहास रचला आहे. इंग्लंडकडून चौथ्या डावात सलामीवीर बेन डकेटने शानदार शतकी खेळी करुन आपल्या संघाचा विजय सुकर केला. त्याच्या शतकाच्या जोरावर पाचव्या दिवशी इंग्लिश संघाने ३५० धावांचा टप्पा सहज पूर्ण केला. या विजयासह इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी मिळवली आहे.
बेन डकेटने १७० चेंडूंचा सामना करत १४९ धावा केल्या. तसेच त्याचा जोडीदार सलामीवीर जॅक क्रॉलीने देखील ६५ धावा करुन महत्वाची भूमिका वठवली. डकेट आणि क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची मोठी भागीदारी केली. या भागीदारीनंतर टीम इंडियाचे मनोबल खचलेले दिसून आले. नंतर जो रूटने ५३ धावा आणि जेमी स्मिथने ४४ धावा करुण विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा : IND vs ENG : भारताच्या पराभवाला कारणीभूत कोण? कर्णधार गिल म्हणाला, ‘खेळाडूंचे फारसे योगदान…’
हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने मोठे विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सामना संपल्यानंतर गंभीरने पत्रकार परिषद बोलवली. दरम्यान त्यांनी स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबद्दल मोठी अपडेट दिली. त्याच वेळी, त्यांच्या या अपडेटनंतर कर्णधार गिल स्वतः देखील चिंतेत दिसून आला आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने जसप्रीत बुमराहवरील कामाच्या बोजाबाबत अपडेट दिली आहे. गंभीर ने सांगितले की, बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पाचही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. तसेच गंभीरने सांगितले की बुमराह इंग्लंडमध्ये फक्त तीन कसोटी सामने खेळू शकणार आहे. गंभीरचे हे विधान टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
गंभीरने सांगितले की “बुमराह तीन सामन्यांमध्ये खेळेल, त्याच्याशिवाय टीम इंडियाला इंग्लंडमध्ये दोन सामने खेळावे लागणार आहेत.” पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बूमराहने शानदार गोलंदाजी करत त्याने पाच विकेट घेतल्या.
तर जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त टीम इंडियाचे इतर गोलंदाज इंग्लंडविरुद्ध आपली छाप पाडता आली नाही. विकेट घेणे तर सोडाच, इतर गोलंदाजांना धावा देखील रोखण्यात त्यांना अपयश आले. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाकडून न खेळणे अडचणीचे कारण बनण्याची शक्यता आहे.