शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या लीड्स कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाचा ५ विकेट्सने लाजिरवाणा पराभव केला आहे. भारताने इंग्लंडला चौथ्या डावात ३७१ धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंड संघाने ही आव्हान यशस्वीपणे पूर्ण करुण विजयी सुरवात केली आहे. इंग्लंडकडून चौथ्या डावात सलामीवीर बेन डकेटने शानदार शतकी खेळी करुन आपल्या संघाचा विजय सोपा केला. त्याच्या शतकाच्या जोरावर पाचव्या दिवशी इंग्लिश संघाने ३५० धावांचा टप्पा सहज गाठला. या विजयासह इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
बेन डकेटने १७० चेंडूंचा सामना करत १४९ धावा केल्या. त्यात त्याने २१ चौकारांची बरसात केली. याशिवाय त्याचा जोडीदार सलामीवीर जॅक क्रॉलीने देखील ६५ धावा करुन महत्वाची भूमिका बाजवली. डकेट आणि क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची मोठी भागीदारी केली. या भागीदारीनंतर टीम इंडियाचे मनोबल खचलेले दिसून आले. नंतर जो रूटने ५३ धावा आणि जेमी स्मिथने ४४ धावा करुण विजयावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम डावात इंग्लंडविरुद्ध ३७१ धावांचा बचाव करण्यात टीम इंडिया अपयशी ठरली आहे. पाचव्या दिवशी इंग्लंडला ३५० धावांची आवश्यकता असताना त्यांनी ती त्यांनी सहजपणे पूर्ण केली. या दरम्यान बुमराह, सिराज किंवा प्रसिद्ध कृष्णा यांची कामगिरी अपेक्षित अशी दिसून आली नाही.
अंतिम डावात टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २-२ बळी टिपले. तर रवींद्र जडेजाला एक बळी मिळाला. पण हे सर्व बळी तेव्हा आले जेव्हा सामना हातातून निसटून गेला होता. टीम इंडियाला १८८ धावांवर पहिली विकेट घेता आली. त्यानंतर देखील इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीला जुमानले नाही. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल अस्वस्थ दिसून आला. त्याने लीड्समध्ये इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचे कारण देखील सांगितले आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : टीम इंडियाच्या पराभवा मागे कोण? समोर आले दोन खलनायक; इंग्लंडविरुद्ध महागात पडल्या ‘या’ चुका..
भारतीय संघाचा तरुण कर्णधार लीड्समधील पराभवाच्या कारणांवर चर्चा केली. त्याने म्हटले आहे की, “माझ्या मते, हा कसोटी सामना अद्भुत असा होता. आम्हाला जिंकण्याच्या संधी बऱ्याच होत्या, पण आम्ही बरेच झेल देखील सोडले आणि खालच्या फळीतील फलंदाजांकडून फारसे योगदान मिळाले नाही. तरीही, मला माझ्या संघाचा अभिमान आहे. काल आम्हाला वाटत होते की ४३० धावा केल्यानंतर आम्ही डावाची घोषणा करू. पण दुर्दैवाने आम्ही आमचे शेवटचे ६ बळी फक्त २० ते २५ धावांमध्येच गमावले. हे संघासाठी नक्कीच चांगले लक्षण नाही.”