ईशान किशन(फोटो-सोशल मीडिया)
ICC T20I Player Rankings : आयसीसीकडून बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमावरीमध्ये भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने चांगलीच उडी घेतली आहे. आयसीसी पुरुष T20I क्रमवारीत ईशान किशन 32 स्थानांची मोठी उडी मारली आहे. तर पाकिस्तानी सॅम अयुब अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहचला आहे.
इशान किशनने बऱ्याच काळानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून संघात पुनरागमन केले. इशान किशनने मालिकेतील तीन सामन्यांमध्ये 76, 28 आणि 103 धावा काढून आपली क्षमता सिद्ध केली. या मालिकेत एकूण 207 धावा करण्यासोबतच, त्याने त्याच्या T20I कारकिर्दीतील पहिले शतक देखील झळकावले. या प्रभावी फलंदाजीसह, इशान 2026 चा T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी 32 व्या स्थानावर जाऊन पोहोचला आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आपली दावेदारी पक्की केली.
हेही वाचा : ‘वय हा माझ्यासाठी निकष…’ रोहित-कोहलीच्या 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबाबत एमएस धोनीचे मोठे विधान
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने या क्रमवारीत चांगली सुधारणा केली. त्याने पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला मागे टाकत फलंदाजांच्या यादीत सहावे स्थान पटकावले. तर भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर कायम आहे.
दरम्यान, नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर सॅम अयुबने टी-20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर कब्जा केला.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 23 वर्षीय अयुबने 119 धावा फरकवल्या केल्या आणि तीन विकेट्स देखील काढल्या. या प्रभावी कामगिरीसह त्याने झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला पिछाडीवर टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
पाकिस्तानचा आघाडीचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदने गोलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा करत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तो आता वरुण चक्रवर्तीपेक्षा फक्त 28 गुणांनी पिछाडीवर आहे. मालिकेत पाच विकेट्स घेणारा पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नवाज गोलंदाजांच्या क्रमवारीत आठ स्थानांनी पुढे सरकला आहे. तर इंग्लंडचा लेग-स्पिनर आदिल रशीद दोन स्थानांचा फायदा होऊन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर आठ स्थानांनी पुढे सरकून क्रमवारीत 23 व्या स्थानी पोहोचला आहे.
टॉप-10 फलंदाजांच्या यादी देखील काही बदल झाले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार जोस बटलर तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. तर श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निस्सांका पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा टिम सेफर्ट नवव्या स्थानी विराजमान झाला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिकल्टन 42 स्थानांनी पुढे जाऊन 40 व्या स्थानावर पोहचला आहे.






