DC आणि RCB यांच्यात रंगणार अंतिम सामन्यात घमासान(फोटो-सोशल मीडिया)
DC vs RCB, WPL 2026 Final : आज महिला प्रीमियर लीगचा फायनल सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. विजेतेपदाचा सामना सायंकाळी ७:३० वाजता वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर सुरू होणार आहे. आरसीबीने २०२४ मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी जेतेपदावर नाव कोरून इतिहास घडवला होता, आता देखील आरसीबीने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहचली आहे, परंतु अद्यापही त्यांना पहिली ट्रॉफी मिळवता आली नाही.
यापूर्वी दोन्ही संघ २०२४ च्या(WPL 2026) अंतिम सामन्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. या सामन्यात आरसीबीने डीसीचा ८ विकेट्सने पराभव करून जेतेपदावर बाजी मारली होती आणि डीसीला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. चालू हंगामात, आरसीबीने लीग टप्प्यात पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली. तर डीसीने एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सला ७ विकेट्सने धूळ चारून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.
चालू (WPL 2026) हंगामाच्या सुरुवातीला वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवरील खेळपट्टी संथ असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या खेळपट्टीवर धावा करणे कठीण झाले होते. तथापि, गेल्या काही सामन्यांमध्ये खेळपट्टी सुधारली असल्याने फलंदाजांना चांगला आधार मिळाला आहे. धावा काढणे आता अधिक वारंवार होत असल्याचे दिसत आहे. लक्ष्यांचा पाठलाग करणे आधीच्या तुलनेने सोपे झाले आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५०-१६० धावांच्या आसपास असून फिरकीपटूंना काही मदत मिळत आहे, परंतु फलंदाज मोकळेपणाने खेळू शकतात. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.
वडोदरामधील हवामान आज उबदार राहण्याची अपेक्षा आहे. तेजस्वी सूर्यप्रकाशासह हलके धुके देखील दिसू शकते. किमान तापमान २१ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची अपेक्षा आहे. चांगली बातमी अशी आहे की पावसाची शक्यता नाही.
अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल. सामन्याचे लाईव्ह अपडेट्स नवभारत लाईव्हवर देखील मिळू शकतात.
आरसीबी: स्मृती मानधना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, दयालन हेमलता, नदीन डी क्लार्क, रिचा घोष (यष्टीरक्षक), गौतमी नायक, लिन्से स्मिथ, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, लॉरेन बेल.
डीसी: जेमिमा रॉड्रिग्ज (कर्णधार), शफाली वर्मा, लिझेल ली (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड, मॅरिझाने कॅप, निकी प्रसाद, अलाना किंग, मिन्नू मणी, स्नेह राणा, श्री चरणी, नंदनी शर्मा.






