Virat Kohli tops the ICC ODI rankings : आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. तर त्याचा सहकारी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने चार वर्षानंतर अव्वलस्थान पटकावले आहे. रोहित शर्मा आता तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल आता दुसऱ्या स्थानी झेप घेतली. जुलै २०२१ नंतर विराट कोहलीने पहिल्यांदाच जगातील अव्वल क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
भारतीय फलंदाजी सुपरस्टार विराट कोहलीमे गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील तीन सामन्यांमध्ये १३५, १०२ आणि नाबाद ६५ धावा करून आपली कमाल दाखवून दिली. त्यानंतर रविवारी वडोदरा येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील त्याने शानदार ९३ धावांची खेळी करत संघाला चार विकेटने विजय मिळवून दिला.
हेही वाचा : WPL 2026 : हरमनप्रीत कौरने घडवला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारी ती ठरली जगातील पहिलीच खेळाडू
कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ शून्यावर बाद झाल्यावर त्याने सिडनीमध्ये शानदार ७४ धावांसह द्विपक्षीय मालिका संपवली होती. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने देखील शर्माला मागे टाकले आहे. पहिल्या सामन्यात मिशेलने ८४ धावा केल्याने तो दुसऱ्या स्थानावर जाऊन विराजमान झाला आहे.
एकदिवसीय क्रमवारीत भारताचा भरवशाचा फलंदाज केएल राहुल एका स्थानाने वर येऊन अकराव्या स्थानावर पोहोचला आहे आणि डेव्हॉन कॉनवे तीन स्थान पुढे चढून २९ व्या स्थानांवर पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये, मोहम्मद सिराज पाच स्थानांवरून १५ व्या स्थानी आला आहे. तर काइल जेमिसन २७ स्थानांवरून ६९ व्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसी पुरुषांच्या कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये, ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सिडनी येथे झालेल्या शेवटच्या अॅशेस कसोटीत पहिल्या डावात शतके ठोकल्यानंतर अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर जाऊन विराजमान झाले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारा इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानी कायम आहे. तर हॅरी ब्रूक दुसऱ्या स्थानावर आहे. जेकब बेथेल २५ स्थानांनी पुढे जाऊन ५२ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.
कसोटी गोलंदाजी क्रमवारीत, मिशेल स्टार्कच्या ३१ विकेट्समुळे त्याला मोठा फायदा झाला आहे. तो आता नवव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे आणि त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीमुळे तो पहिल्या पाच कसोटी अष्टपैलूंमध्ये देखील त्याने स्थान मिळवले आहे. स्कॉट बोलँडच्या २० विकेट्समुळे त्याला त्याचे सातवे स्थान कायम ठेवले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पाच विकेट्स घेऊन श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा आयसीसी पुरुष टी२० खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. पाकिस्तानचे फलंदाज साहिबजादा फरहान आणि सलमान आघा यांनीही त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. तेर अनुक्रमे पाचव्या आणि ४१ व्या स्थानावर पोहोचले आहेत.






