वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामान्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या वेळी इंग्लंडमध्ये १९ वर्षाखालील भारतीय युवा संघ देखील किर्केट खेळत आहे. अशावेळी सर्वात जास्त चर्चेत असणारा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी एकामागून एक कामगिरी करताना दिसत आहे. त्याने पहिल्या युवा कसोटीत अर्धशतक आणि विकेट्स घेण्याचा पराक्रम देखील केला आहे. असे करणारा तो सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. वैभवन सूर्यवंशीने आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी हा विक्रम मोडीत काढला आहे.
पहिल्या युवा कसोटी सामन्यात वैभव सूर्यवंशीला पहिल्या डावात फक्त १४ धावा केल्या होत्या. मात्र, त्याने दुसऱ्या डावात आपला जलवा दाखवला. त्याने ४४ चेंडूत ५६ धावांची खेळी खेळली. यासोबतच त्याने गोलंदाजी करताना दोन विकेट्स देखील मिळवल्या आहेत. वैभव हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. वैभव १५ वर्षांच्या वयाच्या आधी युवा कसोटी सामन्यात अर्धशतक आणि विकेट घेणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा : टीम इंडियाला झटका! इंग्लंडहून मायदेशी परतला ‘हा’ खेळाडू; न खेळण्याचे कारण आले समोर..
वैभवने आपल्या कामगिरीनंतर एक विक्रम मोडीत काढला आहे. वैभवने बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी, बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने अशी कामगिरी करून दाखवली होती. ज्याने २०१३ मध्ये मीरपूर येथे श्रीलंकेविरुद्ध १५ वर्षे १६७ दिवसांच्या वयाचा असताना ही कामगिरी केली होती. तो दोनदा ही कामगिरी करणारा सर्वात तरुण खेळाडू देखील ठरला होता. तथापि, आता हा विक्रम वैभवच्या खात्यात जमा झाला आहे.
तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने देखिल असा पराक्रम केला आहे. त्याने २००२ मध्ये कोलंबो येथे इंग्लंडविरुद्ध १५ वर्षे २४२ दिवसांच्या वयात हा कारनामा केला होता. दरम्यान, सूर्यवंशी आता आंतरराष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेटच्या कसोटी फॉरमॅटमध्ये अनेक अर्धशतके करणारा सर्वात तरुण विक्रमधारी खेळाडू ठरला आहे.
पहिल्या युवा कसोटी सामन्यात, भारताने प्रथम फलंदाजी केली. यावेळी कर्णधार आयुष म्हात्रेच्या शतकाच्या आणि विहान मल्होत्रा, यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडू, राहुल कुमार आणि आरएस अम्ब्रिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५४० धावांचा डोंगर रचला आहे. दुसरीकडे, इंग्लंडकडून अॅलेक्स ग्रीन आणि राल्फी अल्बर्टने प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा संघ ४३९ धावांवरच गारद झाला. रॉकी फ्लिंटॉफने सर्वाधिक ९३ धावांची खेळी खेळली. भारताकडून हेनिल पटेलने तीन बळी टिपले.
हेही वाचा : चोरीचा मामला! माजी भारतीय कर्णधाराच्या घरी पडला दरोडा, पैसे आणि ही खास वस्तू घेऊन चोर फरार
दुसऱ्या डावात भारताचा संघ २४८ धावाच करू शकला. कर्णधार म्हात्रेने सर्वाधिक ६३ धावा केल्या. इंग्लंडकडून आर्ची वॉनने सहा बळी टिपले.विजयासाठी ३५० धावांची आवश्यकता असताना, इंग्लंडला फक्त २७०/७ धावाच करू शकला आणि सामना अनिर्णित राहिला. कर्णधार हमजा शेखने शतक ठोकले.