सौरव गांगुली(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. भारताने इंग्लंडवर संघर्षपूर्ण विजय मिळवला आहे. या विजयात मोहम्मद सिराज विजयाचा शिल्पकार ठरला. भारताच्या या विजयाने संपूर्ण देशात आनंद व्यक्त होत आहे. अशातच भारतीय संघाचा माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली टीम इंडियाच्या या विजयावर आनंद व्यक्त करत म्हटले आहे की, त्याला आधीच आशा होती की टीम इंडिया पाचव्या कसोटीमध्ये विजय मिळवेल.
सौरव गांगुलीने पत्रकारांना सांगितले की, “चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा माझ्या मनात होते की भारतच जिंकणार. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती खूपच शानदार होती. भारतीय संघात खूप प्रतिभा असून ही तरुण टीम उत्तम आहे.”
हेही वाचा : IND vs ENG 5th Test : गौतम गंभीर सामना जिंकल्यानंतर वेडावला! बीसीसीआयच्या पोस्टमध्ये उघड, Video Viral
माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने देखील भारताच्या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आयएएनएसला सांगितले की, “जर जयस्वालने शतक केले नसते तर स्कोअरबोर्डवर बचाव करण्यासाठी धावाच राहिल्या नसत्या. तो आक्रमक फलंदाज आहे, परंतु या डावात तो शांत दिसत होता. या विजयाचे श्रेय जयस्वालला देखील जाते. त्याच्या शतकामुळेच संघाला एवढी धावसंख्या गाठणे सोपे गेले. फलंदाजीच्या दृष्टीने ही सर्वात कठीण अशी खेळपट्टी होती.”
कैफ पुढे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे देखील कौतुक केले आणि म्हटले की, “त्याने सिंहाचे धाडस दाखवले. त्याने सांगितले की तो थकणार नाही. त्याने एक टोक लावून धरले आणि सतत गोलंदाजी करत राहिला. सिराजने तरुणांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.” कैफ पुढे म्हणाला की,” शुभमन गिल कर्णधार म्हणून खूप वेगाने शिकत असून सामना अनिर्णित करण्यासाठी त्याला ही कसोटी जिंकावी लागली. तो या सामन्यात खूप शांत दिसला.”
केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात आलेल्या या निर्णायक सामन्यात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये २२४ धावा केल्या. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली होती, तर इंग्लंडकडून गस अॅटकिन्सनने सर्वाधिक पाच बळी टिपले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडला पहिल्या डावात २४७ धावाच करता आल्या आणि नाममात्र २३ धावांची आघाडी मिळवली. यावेळी हॅरी ब्रूकने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या डावात प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : India vs England मालिकेनंतर टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले. या डावात यशस्वी जयस्वालने शतक झळकावताना ११८ धावा केल्या, तर आकाश दीप ६६, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी ५३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला भारताने ३६७ धावांवर बाद केले. जो रूट (१०५) आणि हॅरी ब्रूक (१११) यांनी शतके झळकावली पण ते संघाला विजय मिळवू शकले नाहीत. अखेर पाचव्या दिवशी भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने चार बळी टिपले.