मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Shami has no contract against South Africa : आगामी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध च्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात भारतीय स्टार फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. परंतु, स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला मात्र यावेळी देखील संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. यावरून आता वादाची ठिणगी पडली आहे. भारतीय संघाच्या स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची कारकीर्द संपुष्टात येत असल्याचे दिसू लागले आहे. फिटनेसच्या कारणामुळे काही काळापासून संघाबहेर असणाऱ्या शमीला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. यामुळे आता बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या संघात ऋषभ पंत संघात परतला तर, प्रसिद्ध कृष्णाच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीपची निवड केली गेली आहे. पण बंगाल क्रिकेट संघ आणि टीम इंडियामधील वरिष्ठ खेळाडू असलेल्या शमीकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. वास्तविक पाहता तो सातत्याने रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे आणि शानदार कामगिरी करताना दिसत आहे.
अलिकडेच, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी शमीला डच्चू देण्यात आल्याबद्दल विचारले असता, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी त्याच्या तंदुरुस्तीचा उल्लेख केला होता. आगरकर म्हणाले की जर तो पूर्णपणे तंदुरुस्त असता तर तो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही ठिकाणी तो गेला असता. आगरकर यांनी असे देखील सांगितले की शमी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे आणि नंतर त्याचा विचार केला जाईल. तेव्हापासून, स्टार वेगवान गोलंदाजाने बंगालसाठी सलग तीन रणजी ट्रॉफी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १५ विकेट्स देखील घेतल्या आहेत आणि संघाला दोन सामने जिंकण्यास मोठे योगदान देखील दिले आहे. या काळात शमीने दोन डावांमध्ये पाचपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत आणि एकूण ९५ षटके गोलंदाजी केली आहे.
या दरम्यान मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. त्याची धारदार गोलंदाजी आणि त्याचा फॉर्म बघून त्याला संघात स्थान देण्यात येईल अशी अटकळ बांधली जात होती. पण आगरकर आणि संघ व्यवस्थापन अजूनही शमीच्या तंदुरुस्तीवर नाराज आहे की काय असे वाटू लागले आहे. की मोहम्मद शमीचे विधान निवड समिती आणि बोर्डाला नाराज करत आहे आणि त्यासाठी त्याच्याबाबत कठोर भूमिका घेण्यात येत आहे. याची अद्याप काही एक स्पष्टता नाही. शमीला कसोटी संघात स्थान न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.






