भारत विरुद्ध नेपाळ सामन्याने होणार खो-खो विश्वचषकाचा शुभारंभ, दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणार सामने
नवी दिल्ली : पहिल्या वहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेची तयारी आता पूर्ण झाली असून, १३ ते १९ जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे. जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत खेळणार असून, ही स्पर्धा खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात सामने होणार असून, सर्व चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.
इंदिरा गांधी मैदानावर होणार स्पर्धा
खो-खो विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १३ जानेवारी २०२५ रोजी इंदिरा गांधी मैदानावर होणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध नेपाळ असा उदघाटनाचा सामना खेळवला जाईल. स्टार स्पोर्ट्सवरून हे सामने स्टार स्पोर्ट्स १ एचडी आणि स्टार स्पोर्ट्स फर्स्ट या वाहिनीवरून थेट प्रसारित करण्यात येणार आहेत. दूरदर्शनवरूनही या सामन्यांचे थेट प्रसारण दाखवण्यात येईल. त्याचवेळी डिस्ने हॉटस्टार या ओटीटीवरुनही सामने बघायला मिळणार आहेत.
पुरुष वर्ग : गटवारी आणि सामने
पुरुषांच्या स्पर्धेमध्ये २० संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
गटवारी :
अ गट : भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
ब गट: दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड, इराण
क गट: बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
ड गट: इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया
भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सामने सुरु होती. पहिल्या सामन्यात भारताची गाठ नेपाळशी पडणार आहे. साखळी सामने १६ जानेवारीस संपतील. त्यानंतर १७ जानेवारीपासून प्लेऑफ फेरी सुरू होईल.
पुरुषांची अंतिम लढत १९ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वाजता होईल. या लढतीने स्पर्धेचा रोमहर्षक समारोप होईल.
महिला वर्ग : गटवारी आणि सामने
महिला विभागात पुरुषांच्या स्वरूपाचे प्रतिबिंब दिसून येईल. महिला विभागात १९ संघांना चार गटात विभागण्यात आले आहे.
अ गट : भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया
ब गट: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड
क गट: नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
ड गट: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया
महिलांचा सलामीचा सामना १४ जानेवारीस सकाळी ११.४५ वाजता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळविण्यात येईल. भारतीय महिला संघाचा पहिला सामना १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता दक्षिण कोरियाशी होईल. महिला गटाचेही साखळी सामने
१६ जानेवारीस संपतील. १७ जानेवारीस प्लेऑफ लढती होईल. महिला अंतिम सामना १९ जानेवारीस संध्याकाळी ७ वाजता खेळविण्यात येईल.
प्लेऑफ तपशील आणि स्वरूप
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ, तिसऱ्या क्रमांकाच्या दोन सर्वोत्तम संघांसह, उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने होतील. बाद फेरीतून विजेतेपदाच्या लढतीपर्यंतचा मार्ग निश्चित होणार असल्यामुळे चाहत्यांना सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन बघायला मिळेल. विजयासाठीची चुरस या फेरीत अधिक तीव्र झालेली दिसून येईल. सं
ही ऐतिहासिक स्पर्धेत केवळ खो खोच्या आंतरराष्ट्रीय अस्तित्वार प्रकाश टाकणार नाही, तर एक सांस्कृतिक वारसा आणि खिलाडूवृत्तीचे यथार्थ दर्शनही स्पर्धेतून घडणार आहे. सर्व सामने इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे. चाहत्यांना आता स्पर्धेतील रोमांचक क्षणाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.