भारत विरुद्ध बांग्लादेश : 28 एप्रिलपासून भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने येथे पार पडलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेश महिला संघावर 44 धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाने पहिली फलंदाजी करून बांग्लादेश समोर 146 धावांचे लक्ष्य उभे केले होते. परंतु बांग्लादेशच्या संघाने 20 षटकांत आठ बाद 101 धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताच्या रेणूका सिंग, पूजा वस्त्रकार यांच्यासह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताला विजय मिळाला. 18 धावांत तीन फलंदाज बाद करणारी रेणूका सिंग ही सामन्याची मानकरी ठरली. शेफाली वर्माने 31 धावांची, यास्तिका भाटीयाने 36 धावांची, कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 धावांची आणि रिचा घोषने 23 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 20 षटकांत सात बाद 145 धावा फटकावल्या. रेणूका सिंग हिने 18 धावांमध्ये दिलारा अख्तेर, शोभना मोस्तरी व राबेया खान यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पूजा वस्त्रकार हिने 25 धावा देत दोन फलंदाज बाद केले. तसेच श्रेयांका पाटील, दीप्ती शर्मा व राधा यादव यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामधील दुसरा सामना 30 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित तीन सामने 2 मे, 6 मे व 9 मे रोजी होणार आहेत.