सुनील गावस्कार, श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ बीसीसीआयकडून स्थगित केल्यानंतर आता पुन्हा एकदा सुरू झाले आहे. आतापर्यंत ६१ सामने खेळवण्यात आले आहेत. या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज शानदार कामगिरी करत असल्याचे दिसत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने १२ पैकी ८ सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सच्या विजयानंतर, जीटी, आरसीबीसह पंजाब किंग्जनेही प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला आहे. यासोबतच श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाची मोठ्या प्रमाणात क्रीडा विश्वात खूप चर्चा रंगली आहे.
आयपीएल २०२४ मध्ये, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद आपल्या नावावर केले होते. अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाबला यावर्षी देखील विजेतेपद जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. या संदर्भात, माजी क्रिकेट दिग्गज सुनील गावस्कर यांनी त्यांच्याबद्दल एक विधान केले आहे. तसेच त्यांनी यावेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा देखील साधला आहे.
हेही वाचा : RR vs CSK : तळाचे संघ आज आमनेसामने! चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणार प्रतिष्ठेची लढाई
आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्ज प्लेऑफमध्ये पात्र ठरल्यानंतर सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना झाल्यानंतर सुनील गावस्कर म्हणाले, “केकेआरमध्ये श्रेयस अय्यरचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्रेयसने संघाला चॅम्पियन बनवले. पण सर्व श्रेय गौतम गंभीरला देण्यात आले. ”
“हंगामाच्या सुरुवातीला गौतम गंभीर केकेआरमध्ये मेंटर म्हणून सामील झाला. आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर, संपूर्ण कथा गौतम गंभीरसाठी चालवण्यात आली. खर तर श्रेयस अय्यर त्यास पात्र होता. गेल्या हंगामात जेतेपद जिंकण्याचे श्रेय श्रेयस अय्यरला मिळाले नाही. सर्व श्रेय दुसऱ्याला देण्यात आले होते.” असे देखील गावस्कार म्हणाले.
सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, “कोणत्याही सामन्यात कर्णधाराची भूमिका महत्त्वाची असते. कोणीही शून्यावर बसून संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही. या वर्षी श्रेयस अय्यरला खऱ्या अर्थाने सर्व श्रेय मिळत आहे. यावेळी रिकी पॉन्टिंगने पंजाबला विजय मिळवून दिला असे कोणीही म्हणताना दिसत नाही.”