जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
Jaspreet Bumrah : मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह संघात सामील झाला असून ही बाब मुंबईसाठी चांगली मानली जात आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना 7 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणारा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यापूर्वी बुमराहच्या पुनरागमनाने संघात नव्याने ऊर्जा भरली आहे. जसप्रीत बुमराहच्या संघातील समावेशावर मुंबई इंडियन्सकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये संजना गणेशन त्याचे वडील जसप्रीत बुमराहची गोष्ट मुलगा अंगदला सांगताना दिसत आहे. तर मुंबईने व्हिडिओ कॅप्शनमध्ये ‘सिंह गर्जना करण्यास तयार’ असल्याचे लिहिले आहे.
पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसनास होता. मात्र, त्याच्या पुनरागमनाबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. पण अखेर बुमराह मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. बुमराह नेमका कोणत्या सामन्यातून मैदानात उतरेल याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु, तो १३ एप्रिल रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या सिडनी कसोटी दरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत जाणवली होती. त्यानंतर बुमराहला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला देखील मुकावे लागले होते. पण, आता मुंबईच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून लवकरच बूमराह मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करताना दिसून येणार आहे.
बूमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. जसप्रीत बुमराह 2013 वर्षी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी झाला. तेव्हापासून, 31 वर्षीय जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये एकूण 133 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 7.30 च्या इकॉनॉमीने रेटने गोलंदाजी करताना एकूण 165 विकेट्स मिळवल्या आहेत.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे. केवळ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा एकमेव सामना मुंबई इंडियन्सने आपल्या नावे केला आहे. मुंबई इंडियन्सचा आगामी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 7 एप्रिल रोजी खेळला जाणार असून हा सामना वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.