नवी दिल्ली : शुक्रवार २ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची (AIFF) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत तब्बल ८५ वर्षांनंतर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला प्रथमच खेळाडू असलेला अध्यक्ष मिळाला. माजी गोलरक्षक असलेले कल्याण चौबे (Kalyan Chaubey) यांनी अध्यक्षपदाची निवडणूक ३३ मतांनी जिंकली आहे.
मागील अनेक काळापासून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची निवडणूक न झाल्यामुळे फिफाने भारतीय संघाच्या फुटबॉल खेळण्यावर बंदी आणली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे गेल्यावर कोर्टाने लवकरात लवकर एआयएफएफला निवडणूक घेण्याचे आवाहन केल्यानंतर फिफाने कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेऊन भारतावरील बंदी उठवली. याच पाश्ववभूमीवर एआयएफएफच्या माध्यमातून २ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली.
अध्यक्ष पदाच्या लढतीत मुख्यत्त्वे माजी गोलरक्षक कल्याण चौबे आणि कधी काळी भारतीय संघाचे कर्णधार असलेले दिग्गज खेळाडू बायचुंग भुतिया (Baychung Bhutiya) या दोन उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली. यात चौबे यांना ३३; तर शंभराहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या भुतिया यांना अवघे एकच मत मिळाले.
४५ वर्षीय चौबे हे भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते आहेत. कोलकातामधील सुप्रसिद्ध क्लब मोहन बगानचे ते माजी गोलरक्षक होते. राजकीय क्षेत्रात ताकदवान असलेल्या गुजरात आणि अरुणाचल प्रदेश येथील संघटनांचा त्यांना मोठा पाठिंबा होता. या तुलनेत भुतिया ज्या राज्यातून पुढे आले, त्या सिक्किम राज्यानेही त्यांना पाठिंबा दिला नाही. खेळत असताना ‘सिक्किमिस स्नायपर’ म्हणून त्यांना ओळखले जात होते.
राजकीय पार्श्वभूमी असलेले कल्याण चौबे यांनी भाजपकडून पश्चिम बंगालकडून कृष्णानगरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती; परंतु त्यांचा पराभव झाला होता. चौबे यांची सिनियर गटातील फुटबॉल कारकीर्द क्लब फुटबॉलपुरतीच मर्यादित होती. भारताच्या मुख्य संघातून खेळण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पण चौबे यांनी वयोगटाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. भुतिया यांनी १०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.