खो खो विश्वचषक २०२५ : देशाच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर सभागृह रविवारी खो-खो विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या २३ देशांतील संघांच्या उपस्थितीने काही वेगळेच भासत होते. येथे १३ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत या सर्व संघांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत उदघाटन सोहळ्यात दाखवल्या जाणाऱ्या सांस्कृतिक विविधेची एक नेत्रदीपक झलक पाहायला मिळाली. पारंपरिक भारतीय संगीताने सर्व परदेशी खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली. स्पर्धेविषयी बोलतानाच पत्रकार परिषद सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या उत्सवात रुपांतरित झाली. प्रत्येक देशाने ऐतिहासिक मेळाव्यात स्वतःची वेगळी ओळख जोडली.
परदेशी संघांना भारताच्या भव्य आदरातिथ्याचा अनुभव घेता आला. त्याचवेळी परदेशी खेळाडूंनी आपल्या देशाची सांस्कृतिक झलक दाखवल्यामुळे कार्यक्रमात एक प्रकारची भव्यता आली. आफ्रिकेच्या संघांनी केलेल्या युद्धाच्या नादाने पाहुण्या देशांचे मनोबल उंचावले, तर युरोपियन राष्ट्रांनी दाखवलेल्या नृत्यांच्या हालचालींमुळे उपस्थितांनाही ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे मैदानात एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाचे एक आकर्षण म्हणजे प्रतिष्ठित विश्वचषकासह उपस्थित संघांनी आपले छायाचित्र काढले. शारीरिक हालचाली आणि धोरणात्मक विचार यांच्यातील एक अद्भुत संतुलन या खेळात असल्याचे या वेळी पोलंड संघातील २४ वर्षीय कोनराडने सांगितले. महबिला संघातील कॅरोलिना म्हणाला, आम्ही खो-खो खेळात नवीन असलो, तरी आमची उर्जा अमर्याद आहे. इतर संघांना विशेषतः भारतीय खेळ पाहणे आमच्यासाठी अविश्वसनीय आहे. गेल्या काही महिन्यांच्या प्रशिक्षणामुळे खेळाबद्दलची आमची समज वाढली आहे.
Kho Kho World Cup : आजपासून होणार खो खो विश्वचषकाचा शुभारंभ, भारताला आव्हान देण्याच्या तयारीत संघ
आम्ही ही स्पर्धा खूप गांभीर्याने घेत आहोत. आम्ही भारतीय संघाला कडवा प्रतिकार करु असे दक्षिण आफ्रिका महिला संघाचे प्रशिक्षक मात्शिदिसो म्हणाले. मला खरोखरच याचा आनंद आहे कारण यात पूर्ण स्वातंत्राने खेळण्याची मुभा आहे. तुम्ही मुक्तपणे धावू शकता. यासाठी धोरणात्मक विचारांची आवश्यकता असलेल्या घटकांचा समावेश आहे. शारीरिक हालचाली आणि मानसिक आव्हानाचे मिश्रण या खेळात बघायाल मिळता, असे ऑस्ट्रेलिया संघाचे ब्रिजेट यांनी सांगितले.
या वेळी भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी आपला दृष्टिकोन स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला उपस्थित २३ देशांच्या सहभागाने माझे मन अभिमानाने भरुन आले आहे. जगभरातील प्रतिनिधी, प्रत्येकाने आपल्या स्वदेशी खेळाचा स्वीकार करताना त्यांची राष्ट्रीय ओळख येथे सोबत आणली आहे. खो-खो विश्वचषक स्पर्धा ही सार्वत्रिक आकर्षण आणि आतंरराष्ट्रीय विकासाची क्षमता दाखवून देते, असे मित्तल म्हणाले.
भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. स्पर्धेची तांत्रिक माहिती समजून घेताना परदेशी संघांनी दाखवलेला उत्साह उल्लेखनीय आहे. आमचे आगामी लक्ष आता स्पर्धेत नियमांची स्पष्टता सुनिश्चित करणे आणि सर्वोत्तम दर्जा राखणे यावर राहणार आहे, असे त्यागी म्हणाले.
खो-खो विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन समारंभ १३ जानेवारी २०२५ रोजी इंदिरा गांधी मैदानावर होईल. त्यानंतर भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात उदघाटनीय सामना होईल. स्टार स्पोर्ट्स, स्टार स्पोर्ट्स एचडी १, स्टार स्पोर्ट्स फर्स्टवर सामन्यांचे थेट प्रसारण होणार आहे. देशभर दुरदर्शनवरूनही स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. त्याचवेळी डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुनही सामने दाखवण्यात येणार आहेत.