गांधीनगर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (National Sports Competition) महाराष्ट्राच्या पुरुष सॉफ्टबॉल संघाने (men softball team) सुवर्णपदक (Gold medal) जिंकून एक नवा इतिहास घडवला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सॉफ्टबॉल खेळाचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघांकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती आणि पुरुष संघाने महाराष्ट्रास सुवर्णपदक जिंकून देत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. आज झालेल्या दुसऱ्या क्वॉलिफायर लढतीत महाराष्ट्र संघाने आंध्र प्रदेश संघाला ८-० होमरनने पराभूत केले. त्यानंतर झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघावर १-० होमरनने विजय नोंदवत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात गौरव चौधरी याने उत्कृष्ट पिचिंग करुन छत्तीसगड संघाच्या एकाही खेळाडूचा फटका डायमंडच्या बाहेर जाऊ दिला नाही. कल्पेश कोल्हे, गौरव चौधरी, जयेश मोरे, धीरज बाविस्कर, प्रीतेश पाटील, सुमेध तळवेलकर, अभिषेक सेलोकर, सौरभ टोकसे, पवन गुंजाळ, प्रथमेश वाघ, चेतन महाडिक, हर्षद जळमकर, दीपक खंडारे, राजेश भट, विष्णू जाधव, टिळक, पुरके खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी केली.
दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल खेळात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पदार्पणातच सुवर्णपदक जिंकून एक नवा इतिहास निर्माण केला आहे. या स्पर्धेत छत्तीसगड संघाने रौप्यपदक तर आंध्र प्रदेश संघाने कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघास प्रशिक्षक म्हणून किशोर चौधरी, पियुष आंबुलकर, मिलिंद दर्प, गुलजार शेख, संघ व्यवस्थापक संदीप लंबे, ऐश्वर्या भास्करन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अंतिम सामन्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सहसचिव डॉ. सुरजसिंग येवतीकर व सहसचिव नितीन पाटील, दर्शना पंडित, अक्षय येवले हे उपस्थित होते. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.






