रविवारी ऑस्ट्रेलिया येथे पारपडलेल्या टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानच्या पराभवानंतर अनेक दिग्गज व्यक्तींकडून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तानच्या पराभवानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मेलबर्न क्रिकेट मैदानावर टी २० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवला गेला. मात्र पाकिस्तान संघाचे विश्वचषक यंदाही हुकले. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर ही निराश दिसला. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून म्हंटले, “हा विश्वचषक पाकिस्तान हरला असला तरी पुढील वर्षी भारतात होणारी एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा पाकिस्तान जिंकेल असे म्हंटले.
शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) त्याच्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी खेळाडूंबाबत म्हटले आहे की, ‘तुम्ही खूप चांगले काम केले आहे. तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या जवळ होता, पण तरीही अंतिम सामना खेळला. संपूर्ण विश्वचषकात पाकिस्तानच्या गोलंदाजीने चांगली कामगिरी केली. पाकिस्तानने चांगला खेळ केला, तो विश्वचषक जिंकण्यास पात्र होता. शाहीनची दुखापत हा टर्निंग पॉइंट होता, पण तो ठीक आहे. आता इथून स्वतःला खाली पडू द्यायचं नाही.
शोएब अख्तरने या व्हिडीओमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘जसे बेन स्टोक्सने T20 वर्ल्ड कप 2016 मध्ये षटकार ठोकले आणि त्याच्यामुळेच इंग्लंड मॅच हरली. मात्र आज टीम वर्ल्ड कप जिंकून त्यांची सुटका झाली. पाकिस्तान टीम, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. काळजी करण्याची गरज नाही. मी निराश आणि दुखावलो आहे, पण ठीक आहे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आता आपण भारतात विश्वचषक जिंकू!