ओसाका : भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील (Japan Open Badmintan Championship) गुरुवारचा दिवस हा “कही ख़ुशी कही गम” असा ठरला. एकीकडे एच. एस. प्रणॉयने (H.S Pranaoy) पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर दुसरीकडे अनुभवी खेळाडू किदांबी श्रीकांत (Shrikant) स्पर्धे बाहेर गेला.
लोह कीन येव याने २०२१ मध्ये विश्वविजेता होण्याचा मान संपादन केला होता. सिंगापूरच्या या खेळाडूचे आव्हान प्रणॉयसमोर होते. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर प्रणॉय याने दबावाखाली खेळ उंचावला आणि २२-२० असा विजय साकारला.
दुसऱ्या गेममध्येही प्रणॉय-लोह कीन यांच्यामध्ये रोमहर्षक लढत रंगली. मात्र याही वेळेला प्रणॉयने निर्णायक क्षणी चुका टाळल्या आणि २१-१९ अशी गेमसह लढतही आपल्या नावावर केली. आता पुढील फेरीत त्याच्यासमोर चीनच्या चोऊ चेन याचे आव्हान असणार आहे. मागील दोन लढतींमध्ये प्रणॉयने चेन याला पराभूत केले आहे; पण एकूण लढतींच्या निकालावर नजर टाकता चेन याने प्रणॉयवर ४-३ अशी आघाडी घेतली आहे.
श्रीकांतला गुरुवारी चमकदार खेळ करता आला नाही. जपानच्या कांता सुनेयामा याच्याकडून त्याला पराभवाचा सामना करावा लागला. यजमान देशाचा सुनेयामा याने श्रीकांतला २१-१६, २१-१० असे पराभूत केले. श्रीकांतचा ४० मिनिटांमध्ये पराभव झाला.