“लहरोंसे डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालोंकी कभी हार नहीं होती” असं म्हटलं जातं की, प्रयत्न केल्याने पाहिजे ते साध्य करणं शक्य आहे. मग कितीही अडचणी असो हवं ते मिळवता येतंच. याचीच प्रचिती आली ते म्हणजे पॅरा ऑलिम्पिक स्विमिंग स्पर्धेत. 17 व्या पॅरा ऑलिम्पिक स्विमिंग स्पर्धेत म्हसळ्याचा सेलिब्रल पलसी ग्रस्त ऋषिकेश माळीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच संभाजी नगर येथे पार पडलेल्या राज्य स्तरीय पॅरा ऑलिंपिक स्विमिंग स्पर्धेमध्ये सिनियर मेन्स 50 मीटर, फ्री स्टाईल या प्रकारात (एस् 4 ) या गटात सेरेब्रल पाल्सी या असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या ऋषिकेश शितल सुदाम माळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मोठं यश मिळवलं आहे. म्हसळामधील या मुलाने स्विमिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून सेरेब्रल पाल्सी ग्रस्त पाल्य व पालक यांना एक नवीन मार्ग दाखवला आहे.
स्विमींग स्पर्धा भारतीय ऑलिंपिक संघटना याच्याशी संलग्न महाराष्ट्र राज्य पॅरालिम्पिक असोशिएशन आणि औरंगाबाद ( संभाजी नगर) डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशन द्वारा आयोजित सिद्धार्थ जलतरण तलाव ( संभाजी नगर) येथे पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन संभाजी नगर चे पालक मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते झाले. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील जवळपास 200 स्पर्धकांनी ज्यूनियर, सिनियर मेन वुमेन यांच्या विविध इव्हेंट मध्ये एस. 1 ते एस.14 या विविध गटातून विविध दिव्यांग प्रकारच्या दिव्यांग स्पर्धकांनी भाग घेतला.
म्हसळामधील डोंगरी भागात राहणाऱ्या ऋषिकेशने आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर सेरेब्रलपाल्सी असताना देखील,स्विमिंगच्या कोणत्याही सोई सुविधा नसताना अनेक अडचणींवर मात केली. शरीराच्या वाढत्या स्पास्टीसीटी वर मात करत, स्विमिंगसाठी जसा वेळ मिळेल तसा सरावासाठी नाशिक येथील जिजामाता तरण तलाव गाठून सराव केला. ऋषिकेशच्या या प्रेरणादायी यशाबद्दल जिजामाता तरण तलाव च्या व्यवस्थापक सौ.माया जगताप, अर्जुन सोनकांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.
दिव्यांग मुले असली म्हणून खचून न जाता त्यांना विविध क्षेत्रातील दरवाजे आपण स्वकष्टाने उघडून द्यायला पाहिजेत. त्यांच्यामध्ये जगण्याची, स्पर्धेत सहभाग घेण्याची व जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यात पालकांनी कुठे ही कसूर ठेवत कामा नये असा विचार ऋषिकेशची आई शितल माळी यांनी व्यक्त केला. तसेच सेरेब्रल पाल्सी हा गट प्रकार एकत्र न करता सेरेब्रल पाल्सी या गटाच्या स्पर्धा वेगळ्या स्पर्धा आयोजित करून त्यांना जास्त वाव व प्रेरणा दिली पाहिजे, असं देखील ऋषिगकेशच्या आईने सांगितलं. राज्य स्तरीय पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ स्विमिंग पूल चे व्यवस्थापक अभय कुमार देशमुख, अर्चना जोशी, माधवी जोशी, मोरेश्वर पुजारी, आणि महाराष्ट्र पॅरालिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार नाळे व सर्व पदाधिकारी यांनी अपार मेहनत घेतली.