आरसीबी टीम(फोटो-सोशल मिडिया)
RCB vs PBKS Final Match : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम महामुकाबला काल म्हणजे ३ जून रोजी खेळवण्यात आला होता. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात तब्बल १८ वर्षानंतर पंजाब किंग्जला पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल टायटल आपल्या नवे केले आहे. या विजयाचा आनंद चाहत्यांना बंगळुरूच्या रस्त्यांवर पाहायला मिळणार आहे.
आरसीबी संघाने विजय मिळवताच संपूर्ण शहर लाल रंगात रंगूत गेले होते. “ई साला कप नामदू” (या वर्षी कप आमचा आहे), जे वर्षानुवर्षे घोषवाक्य होते, ते आता प्रत्यक्षात उतरले आहे. चाहते रस्त्यावर उतरून “आरसीबी! आरसीबी!” आणि “कोहली-कोहली!” असा जयघोष करू लागले होते. त्याच वेळी, रात्री रंगीबेरंगी आतषबाजीने संपूर्ण आकाश सुंदर दिसू लागले होते.
आरसीबीचा विजेता संघ आज दुपारी बेंगळुरूला पोहचणार आहे. जिथे शहर त्यांच्या विजेत्यांचे भव्य विजय रथ काढून स्वागत करणार आहे. ही ऐतिहासिक मिरवणूक विधान सौधा येथून सुरू होऊन एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचणार आहे. १.४ किमी लांबीचा हा प्रवास भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील या अभिमानास्पद क्षणी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते विधान सौधाच्या भव्य पायऱ्यांवर संघाचा सत्कार करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ही परेड केवळ उत्सवच नाही तर एक ऐतिहासिक क्षण देखील बनणार आहे.
हा ऐतिहासिक कार्यक्रम सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था आखण्यात आली आहे. ज्यामध्ये ३ पोलिस उपायुक्त (डीसीपी), ९ सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी), १२ निरीक्षक आणि विशेष वाहतूक पोलिस दल तैनात करण्यात येणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन सुरळीतपणे करता यावे म्हणून सीटीओ जंक्शन आणि कॉफी बोर्ड जंक्शनभोवती वाहतूक निर्बंध लादण्यात येणारासल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : Virat Kohli: ‘मला उदास आणि निराश पाहणं अनुष्कासाठी…’ IPL ची ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट झाला भावूक
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सोहळ्यासाठी चाहत्यांसाठी मोफत प्रवेश अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे, जरी अधिकृत दुजोरा अद्याप प्रतीक्षेत आहे. येथे खेळाडू चाहत्यांसमोर ट्रॉफी घेऊन परेड काढणार आहेत. याशिवाय अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील अपेक्षित आहेत.