Rohit Sharma In Vidhan Bhavan : काल वानखेडेवर भारतीय संघाला सन्मानित केल्यानंतर आज पुन्हा महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचे सदस्य असलेले तथा मुंबईकर असलेले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा विधान भवनाच्या हॉलमध्ये सत्कार करण्यात आला.
रोहितच्या मराठी वाक्याने एकच हशा
यावेळी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी भाषण केले. सूर्याच्या भाषणानंतर रोहित उभा राहिला. त्याने त्याच्या मुंबई स्टाईलने मराठीतून बोलायला सुरुवात केल्यावर सर्व आमदारांनी रोहित-रोहितच्या नावाचा जयघोष केला. त्यानंतर त्याने सूर्याच्या वाक्याचा धागा पकडत, ‘सूर्या मगाशी बोलला, त्याच्या हातात कॅच बसला, हो त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी बसवला असता…..’ हे वाक्य म्हणताच हॉलमध्ये एकच हशा पिकला. सर्व आमदार रोहितच्या वाक्यानंतर हसू लागले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा त्यांचे हसू लपवू शकले नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्रीदेखील हसत होते.
वानखेडे काल हाऊसफुल्ल
विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियावर सर्व देशातून स्तुतीसुमने उधळत आहेत. विश्वचषक जिंकल्यानंतर मायदेशी परतल्यावर टीम इंडियाचे जंगी स्वागत त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट भारतीय संघाने घेतली. त्यानंतर विश्वचषक विजयी परेड करता टीम इंडिया मुंबईकडे रवाना झाली. काल तमाम क्रिकेट फॅन्सी खेळाडूंचे जंगी स्वागत केले. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी वानखेडे हाऊसफुल्ल झाले होते.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडून तोंडभरून कौतुक
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी आली आहे. मुंबईमधील मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा जनसागर स्वागतासाठी आल्याचं सर्व जगाने पाहिलं. त्यानंतर टीम इंडियामधील महाराष्ट्रीय चार खेळाडूंचा आज विधानसभेमध्ये सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवन दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी 1 कोटी रूपये दिले. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रूपयांची घोषणा केली. विधानसभेच्या सभागृहात एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांचं कौतुक केलं. यावेळी फडणवीसांनी रोहित शर्माचं कौतुक करताना त्याची एक गोष्ट सर्व नेत्यांना शिकायला लावली आहे.