लंडन : फुटबॉल विश्वात सध्या अनेक उलटफेर सुरु आहेत. मंगळवारी झालेल्या फिफा विश्वचषकाच्या सामन्यात सौदी अरेबियाने मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा पराभव करून सर्वांनाच धक्का दिला होता. तर आता फुटबॉलमधील जगप्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोबद्दलही महत्वाची माहिती समोर येत आहे. रोनाल्डो याला मँचेस्टर युनायटेडने मुक्त केले आहे. त्यानंतर आता रोनाल्डो कोणत्या क्लबमध्ये जाणार याची चर्चा सुरु असून याचे उत्तर फिफा विश्वचषकाच्या शेवटीच मिळेल असे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच ख्रिस्तियानो रोनाल्डोने एका मुलाखती दरम्यान मँचेस्टर युनायटेड क्लब विषयी नाराजी व्यक्त केली होती. यात रोनाल्डोने क्लबकडून आपला विश्वास घात झाल्याचे आणि क्लबमधील काही सदस्य त्याला संघातून बाहेर ठेऊ इच्छित असल्याचा गौप्यस्फोट केला होता. मँचेस्टरचे नवे व्यवस्थापक एरीक टेन हैग यांच्या सोबतही रोनाल्डोचे विशेष पटत नव्हते. रोनाल्डोने मँचेस्टरसाठी ३४६ सामने खेळत १४५ गोल केले होते.
मँचेस्टर युनायटेडसोबत परस्पर सामंजस्याने मी क्लब सोडण्यास तयार झालो आहे. क्लब आणि चाहत्यांचा मी नेहमीच आभारी राहीन. त्यांच्याविषयी असलेले माझे प्रेम कधीच कमी होणार नाही. पण नव्या आव्हानांचा शोध घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे वाटल्याने हा निर्णय घेतला असे ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणाला.