फोटो सौजन्य - InsideSport सोशल मीडिया
Shardul Thakur to play for Lucknow Super Giants in IPL 2025 : आयपीएल २०२५ ची सुरुवात २२ मार्चपासून होणार आहे, जिथे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे पहिल्या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या लीग सुरू होण्यापूर्वी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या रणजी सामन्यांमध्ये त्याने कमालीची कामगिरी केली होती आणि त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे. त्याने रणजीमध्ये फक्त गोलंदाजीनेच नाही तर फलंदाजीने देखील कमालीची कामगिरी केली आहे, त्याचबरोबर त्याने शतके ही ठोकली आहेत.
आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये शार्दूल ठाकूरला कोणीही विकत घेतले नाही त्यामुळे तो अनसोल्ड राहिला. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये असे स्पष्टपणे दिसून येत आहे की, शार्दूल ठाकूर हा आयपीएल २०२५ च्या १८ व्या सीझनमध्ये पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. रविवारी तो लखनौ सुपर जायंट्स (LSG) च्या कॅम्पमध्ये त्यांचा किट घालून सराव करताना दिसला. सराव सत्रादरम्यान शार्दुलच्या गोलंदाजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तथापि, फ्रँचायझीकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या हंगामात एलएसजीला त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या दुखापतींचा सामना करावा लागत आहे, ज्यामध्ये मयंक यादव, आवेश खान आणि मोहसिन खान यांची नावे आहेत. एलएसजी सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये असलेल्या तिन्ही वेगवान गोलंदाजांच्या फिटनेस क्लिअरन्सची वाट पाहत आहे. यामुळे, एलएसजी शार्दुलला संघात समाविष्ट करू शकते अशी अपेक्षा आहे. शार्दुल गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळला होता, पण यावेळी त्याला फ्रँचायझीने कायम ठेवले नाही.
Shardul Thakur was seen training in the LSG camp ahead of IPL 2025 🔵🏏
📸: Lucknow Super Giants #ShardulThakur #LSG #LucknowSuperGiants #IPL #IPL2025 #CricketTwitter pic.twitter.com/q9SrIFFe7B
— InsideSport (@InsideSportIND) March 16, 2025
गेल्या काही महिन्यांपासून शार्दुल उत्तम फॉर्ममध्ये आहे. २०२४-२५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली. त्याने गोलंदाजीत उत्तम कामगिरी केली आणि २२.६२ च्या सरासरीने ३५ विकेट्स घेतल्या. त्याने नऊ सामन्यांमध्ये ५०५ धावा करत आपल्या फलंदाजीचे कौशल्यही दाखवले. त्याच्या कामगिरीमुळे संघाला अनेकदा दबावाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत झाली.
केवळ देशांतर्गत क्रिकेटमध्येच नाही तर शार्दुलचा आयपीएलमध्येही चांगला रेकॉर्ड आहे. आयपीएलमध्ये, या वेगवान गोलंदाजाने ९५ सामन्यांमध्ये ३०.५२ च्या सरासरीने ९४ विकेट्स घेतल्या आहेत, तर बॅटने त्याने ३७ डावांमध्ये १३८.९२ च्या शानदार स्ट्राईक रेटने ३०७ धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल २०२५ मध्ये या फ्रँचायझीचे नेतृत्व ऋषभ पंत करेल. २४ मार्च रोजी विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील.