दुबई : रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळवण्यात आलेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा विजय मिळवला. २३ धावांनी अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला असून श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले. श्रीलंकेकडून भानुका राजापक्षे आणि वानिंदू हसरंगा यांनी संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. दरम्यान, सामना झाल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शानकाने श्रीलंकेच्या या दमदार कामगिरी मागे महेंद्रसिंह धोनीचा देखील मोठा हात असल्याचे त्यांनी सांगितले.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी केली होती. 2021 चे आयपीएल टायटल चेन्नईने जिंकले होते. आता आशिया कपच्या फायनलनंतर दासुन शानका म्हणाला की, ‘दुबईमध्ये झालेल्या आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत सामना जिंकला होता हे माझ्या डोक्यात होते. आम्ही याबाबत चर्चा देखील केली होती.’ चेन्नईने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला होता. तर आशिया कपमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला. चेन्नईच्या त्या सामन्यापासून श्रीलंकेने प्रेरणा घेतली.
आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले होते. त्यानंतर पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर गेला. मोहम्मद रिझवान आणि इफ्तिकार अहमदने सावध फलंदाजी करत डाव सावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोणत्याही गोलंदाजावर हल्ला चढवला नाही. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी ५९ चेंडूत आली. मोहम्मद रिझवानने ४९ चेंडूत ५५ तर इफ्तिकारने ३१ चेंडूत ३२ धावा केल्या होत्या.