मुंबई : बुधवारी भारतातील प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे (National Sports Award) वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Darupadi Murmu) यांच्या हस्ते पार पडकले. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून यात महाराष्ट्रातील सहा जणांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
खरंतर हा भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी हे पुरस्कार खेळाडूंना प्रदान केले जातात. परंतु कोरोना आणि इतर काही कारणांमुळे हा पुरस्कार सोहोळा नोव्हेंबरच्या अखेरीस पार पडला. यावेळी २५ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल याचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यंदा महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर या क्रिकेटपटूंना घडवणाऱ्या दिनेश लाड याना द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर पॅरा नेमबाजांना मार्गदर्शन करणाऱ्या सुमा शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले. फुटबॉल प्रशिक्षक बिमल घोष यांनाही द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. धावपटू अविनाश साबळे, पॅरा जलतरणपटू स्वप्नील पाटील आणि मल्लखांब खेळाडू सागर ओव्हळकर यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आले. अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख बक्षीस रक्कम देण्यात आली. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त मान्यवरांना २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.